कराड : कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत तसेच सिटी स्कॅन एमआरआय डिजिटल एक्सरे सारख्या सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी यांनी अनेकदा आंदोलने केली होती. मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता, याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयला भूलतज्ञ, फिजिशियन व आर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध झाले आहेत.
कराड, पाटण, कडेगाव, विटा, खटाव, इस्लामपूर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान असलेल्या कराडचे उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची जागा रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, 200 खटांचे रुग्णालय करावे, सिटी स्कॅन मशीन, एमआरआय, ट्रॉमा केअर युनिट, डायलेसिस विभाग, डिजिटल एक्स- रे ची सुविधा सुरू व्हावी या मागणीसाठी मनोज माळी यांनी 2017 मध्ये आमरण उपोषण केले होते. यावेळी उपसंचालकांनी मागण्यापूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
त्यानंतर मनोज माळी यांनी आरोग्य संचालक ते मंत्रालयापर्यंत नियमित पाठपुरावा केल्याने मागण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित मागण्यासाठी आंदोलन व पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.
मनोज माळी यांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत उपजिल्हा रुग्णालयाला सोनोग्राफी मशीन, डिजिटल एक्स-रे, डायलेसिस विभाग, गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी, कायमस्वरूपी भूलतज्ञ उपलब्ध झाले आहेत. तर एनएचएम मधून फिजिशियन व आर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. अद्याप 200 खटांचे हॉस्पिटल, ट्रॉमा केअर, युनिट सिटी स्कॅन, नवीन मशीन रेडिओलॉजिस्टिक आदी मागण्या अपूर्ण आहेत, या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.
आरोग्य उपसंचालकांनी आश्वासन पाळले
उपोषण मागे घेताना उपसंचालकांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार डॉक्टर संजोग कदम यांनी काही मागण्या मार्गी लावल्या आहेत, त्यामुळे गरीब रुग्णांची चांगली सोय झाली आहे. उर्वरित मागण्यासाठी नामदार बच्चू कडू व आरोग्य राज्यमंत्री यांच्या मध्ये उपजिल्हा रुग्णालय कराड बाबत लवकरच बैठक होणार आहे.