पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
राज्य मंडळाकडून पूर्वीच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षे पाठोपाठ आता प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे. यात दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.