फलटण प्रतिनिधी:- कोळकी येथील सुमारे सत्तर ते ऐंशीच्या दशकातील तलाठी अरुण देशपांडे यांच्या कार्यकालात झालेले झोल बघता आणि विशेष म्हणजे ज्या मालमत्तेच्या कागदपत्रात त्रूटी आढळतात, तेथे देशपांडे यांच्या नातेवाईकांची व निकटवर्तीयांची नावे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, देशपांडे यांच्या कार्यकालात झालेल्या या झोलमुळे सध्या तालुक्यातील महसूल वर्तुळ खडबडून जागे झाले असून देशपांडे यांच्याकडून मालमत्ता विकत घेणारे खातेदार देखील आता डोक्याला हात लावून बसले आहेत.
उपलब्ध कागदत्रांद्वारे व प्रतिवादी यांच्या म्हणणे नुसार, कोळकीतील सर्व्हे नं. 121/1ब/1ब/1अ या जागेवरुन सध्या सर्वत्र चर्चा होता असताना मात्र, या जागेच्या इतिहासात खोलवर गेल्यास सर्व्हे नं. 121/1ब/1ब/1अ याठिकाणी 81 गुंठे जागा आहे.वास्तविक ही जागा कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची होती. श्रीमंत विक्रमसिंहराजे यांनी ही जागा दि. 10 ऑगस्ट 1978 साली गजानन पांडुरंग भोकरे यांना खरेदी दस्त करुन दिली. अवघ्या दोन हजार रुपयांना कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे यांनी ही जमिन दिली. त्यानूसार दि. 22 सप्टेंबर 1978 रोजी तत्कालीन मंडलाधिकार्यांनी हा दस्त नोंदवला. त्यानूसार 16241 फेरफार क्रमांकाने गजानन पांडुरंग भोकरे यांचा सातबारा देखील तयार झाला.
त्यानंतर दि. 7 सप्टेंबर 1979 रोजी फक्त एका अर्जाद्वारे पुन्हा फेरफार तयार करण्यात आला व फेरफार क्रमांक 16752 प्रमाणे तलाठी अरुण देशपांडे यांचे वडील गोपाळ हणुमंत देशपांडे यांच्या नावे सात बारा तयार झाला. नोंदणी कायद्याप्रमाणे रक्ताचे नाते नसतानाही मालमत्ता हस्तांतरीत झाली असल्याचे इथे दिसत आहे. तलाठी अरुण देशपांडे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ही नोंद धरली का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
त्यानंतर दि. 10 सप्टेंबर 1981 रोजी तहसिलदारांनी ही व आजूबाजूची काही मालमत्ता बिनशेती करण्याचा आदेश काढला. आय. एन. डी./आय. आय./ एन. ए./ एस. आर.-21 याप्रमाणे सदरची मालमत्ता बिनशेती झाली. दि. 3 ऑगस्ट 1982 रोजी फेरफार क्र. 34 ने ही मालमत्ता बिनशेती म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मालमत्ता बिनशेती झाल्यानंतर ज्यांची मालमत्ता आहे, त्यांच्या मालमत्तेचे कजाप न होता स्वतंत्र सातबारे त्यांच्याच नावे तयार होतात. व मूळचा जो एक सातबारा असतो, तो रद्द करण्यात येतो. पण, या प्रकरणात तसे झालेले दिसत नाही. तत्कालीन तलाठ्यांनी हे सात बारे थेट खरेदीदारांच्या नावे केल्याचे समोर येत आहे. सोबतच मूळचा जो एकच सातबारा आहे, तो रद्द करण्यात आला नाही. सध्या या जागेचे दोन सातबारे ऑनलाईन दिसत असून मुळचा सातबारा व खरेदीदारांचे वेगवेगळे सात-बारे येथे दिसत आहेत.
दरम्यानच्या काळात या जागेलगत असणारे मुगुटराव शिंदे व देशपांडे यांचे चतु:सिमेवरुन वादंग झाले. हा वाद फलटण, सातारा आणि मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला. या न्यायालयीन प्रकरणात देशपांडे यांना ही जागा स्वत:च्या नावावर झालीच कशी? याबाबत सिद्ध करण्यात आले नाही. म्हणून तीन्हीही न्यायालयाने त्यांचे अपिल फेटाळून लावले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने 1997 साली दिलेल्या निर्णयानंतर देशपांडे यांनी इतरत्र कोठेही धाव घेतलेली नाही. याउलट देशपांडे यांच्या काही कागदपत्रांनूसार ही जागा भोकरे यांच्याच मालकीची असायला हवी, असे सांगितले आहे. दि. 1 जून 2019 रोजी देशपांडे यांच्या वारसांनी जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या तक्रार अर्जानूसार ही जमिन भोकरे यांचीच आहे, हे स्पष्टपणे त्यांना कबूल केलेले आहे. दि. 15 मार्च 2022 रोजी देशपांडे यांच्या वारसाने फलटणच्या उपविभागीय अधिकार्यांकडे केलेल्या एका अपिलात देखील हे मान्य केलेले आहे.
हे प्रकरण अद्याप येथे संपलेले नाही. दरम्यान, 1995 साली कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांनी ज्यांना जमिन विकली होती ते गजानन पांडुरंग भोकरे हे गृहस्थ माघारी आले. आणि जमिनीचा ताबा आपल्याला अद्यापही मिळालेला नाही, म्हणून माझे पैसे मला माघारी द्या, असे म्हणू लागले. म्हणून दि. 15 मार्च 1995 साली कै. विक्रमसिंहराजे यांनी गजानन भोकरे यांना त्यांचे चिरंजीव प्रमोद व त्यांचे बंधू सुर्यकांत भोकरे यांच्या साक्षीने 25 हजार रुपये माघारी दिले. तशी पावती देखील आजही आढळत आहे.
त्यानूसार भोकरे हे जमिन देण्यास तयार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र दि. 23 मार्च 2022 रोजी भोकरे यांनी तहसिलदारांना दिले आहे. याखेरीज कै. विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांचे वारस श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी माणुसकीच्या नात्याने भोकरे यांच्या वारसांना ४० लाख रुपये देखील चेकने दिले आहेत. त्यानूसार कै. विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या वारसांना भोकरे यांनी जमिन देणे क्रमप्राप्त ठरते आहे.