पावसाळा सुरु होण्याआधी सिंचन प्रकल्पाच्या कालव्यांची व तलाव दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करावी. शेतकऱ्यांना खरीप हंगामात पाण्याची कमतरता पडू नये याकडे लक्ष वेधावे, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन सिंचन सेवा भवनात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, मुख्य अभियंता श्री. पवार, कार्यकारी अभियंता पराते, काटोल पंचायत समिती सभापती धम्मदीप खोब्रागडे, पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. चांडक, जिल्हा परिषद समीर उमप, संबंधित अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. सावनेर, काटोल व मौदा तालुक्याच्या सिंचनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
सावनेर तालुक्यातील खैरी लघु कालव्याचे काम काही त्रुटीच्या पुर्ततेअभावी प्रलंबित असून सीएसआर नुसार हे काम पूर्ण करावे, यासाठी पाठपूरावा करण्यात येईल, असे श्री. केदार म्हणाले. शेतकऱ्यांच्या हंगाम विचारात घेता याकामास गती द्यावी. नागरवाडी व माहूरकुंड तलावाचे काम दोन टप्प्यात घेवून पूर्ण करावे. पेंच बफर झोन मध्ये तलाव येत असल्याने ओव्हर फ्लो होत असे परंतु आता पन्नास टक्यांच्यावर तलाव भरत नाही, याबाबत त्यांची दुरुस्ती करावी. जेणे करुन हंगामात या तलावाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले.
वनविभागामुळे पेंढरी व निमतलाई तलावाचे काम प्रलंबित असून कालवा नादुरुस्त असल्याचे असल्याचे सांगण्यात आले. तलाव तसेच कालवा दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कोची बॅरेज बॅकवॉटरमुळे खेकरा नाला पाण्याखाली येत आहे. रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ही सर्व कामे करण्यात यावी. त्यासोबत अनेक वर्षापासून प्रलंबित खेखरा नाला सौदर्यीकरणावर भर दयावा. त्याचा रितसर प्रस्ताव सादर करावा. त्यास मंजूरी देवून त्यासाठी लागणारा निधी मदत व पूनर्वसन विभागाकडून उपलब्ध केला जाईल, असे ते म्हणाले.
काटोल तालुक्यातील 250 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या कार प्रकल्पाचे काम अनेक दिवसापासून अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरातील गावांची पुनर्वसनाचे काम प्रलंबित असून अधिग्रहण प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यासोबतच 11 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या जलसेतूचे कामही अपूर्ण आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. 2022 पर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना श्री. केदार यांनी दिल्या.
रानवाडी तलावाचे काम बंद असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कमतरता पडू नये याबाबत काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जांब कालवा, नरखेड तालुक्यातील चिखलीनाला व मौदा येथील पेंच प्रकल्पाचे काम अपूऱ्या निधीमुळे प्रलंबित असल्याने ते काम पुर्नजीवन योजनेतून करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गोसीखुर्द प्रकल्पांच्या कालव्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला.