महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : उदयपूर येथील राष्ट्रीय व शिर्डी येथील राज्यस्तरीय नवसंकल्प कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर आज कराड येथे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित एकदिवसीय ’नवसंकल्प कार्यशाळेचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरासाठी जिल्ह्यातून काँग्रेस पदाधिकार्यांनी उपस्थिती दर्शविली. या शिबिराचे आयोजन कराड दक्षिण काँग्रेस कमिटी कडून करण्यात आले. या कार्यशाळेत उदयपूर आणि शिर्डी येथे संपन्न झालेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबजावणी, राजकीय व सामाजिक विषय तसेच काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत मंथन केले गेले. या शिबिरामध्ये जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ प्रकाश पवार तसेच पत्रकार अमेय तिरोडकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ङ्गङ्ग यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, केंद्र सरकार ई डी संस्थेचा वापर द्वेष भावनेतून करत आहेत. या संस्थेची स्थापना काँग्रेस काळात च झाली पण काँग्रेस ने कधीही यांचा वापर द्वेष भावनेतून केला नाही. भाजप ने या सर्व केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात सामील केले. पण चौकशी लावलेल्यांचे पुन्हा काय झाले हा एक अनुत्तरित प्रश्नच आहे. साम दाम दंड भेद चा वापर करून सत्तेत येऊन हुकूमशाही सारखे निर्णय मोदी सरकार जनतेवर लादत आहे. यासाठी काँग्रेस ने एकसंधतेने सामना केला पाहिजे. जनतेचे प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले कि, १३७ वर्ष जुन्या असणार्या काँग्रेस पक्षाने कायम देशहिताचा विचार केला आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असताना काँग्रेस पक्षाची भविष्यकालीन रूपरेषा ठरवण्याचे काम राष्ट्रीय व राज्यपातळीवर करण्यात आले असून हे धोरण जिल्हास्तरावरील काँग्रेस पदाधिकार्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीयांना एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष कायमच आघाडीवर राहिला आहे. परंतु, गेल्या ८ वर्षांपासून ध्रुवीकरणाचे राजकारण करत समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या या ‘भारत तोडो’ला काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर देणे गरजचे आहे.
तसेच याप्रसंगी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले कि, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा व पुढे घेऊन जाणारा आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘पुन्हा एकदा काँग्रेस’ चा जो नारा दिला आहे तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी आपण सर्वानी मिळवून एकत्रित काम करणे गरजेचे आहे.