सातारा प्रतिनिधी:-
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिनांक 05 मार्च, 2023 रोजी मौजे दरे, ता. महाबळेश्वर येथे जाऊन शेती विषयक अडचणी तसेच उपलब्ध साधन सामुग्री याविषयी माहिती घेतली. दरे गावचे सरपंच श्री. रणजित शिंदे तसेच विकास सोसायटीचे सचिव श्री. राजेंद्र मोरे यांच्याबरोबर उपस्थित गावातील शेतक-यांशी चर्चा करुन शेतीची सद्यस्थिती व भविष्यातील होणारे संभाव्य बदल आणि त्यामधे महात्मा फुले कृषि विद्यापीठ कश्या स्वरुपात मार्गदर्शन करु शकते याविषयी सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी शेतकऱ्याना कृषि विद्यापीठाने प्रकाशित केलेली कृषि दर्शनी 2023 चे वाटप करण्यात आले तसेच विद्यापीठाचे कॅलेंडर देण्यात आले. शेतीविषयक चर्चा करत असताना पारंपारीक भात शेतीमधे बियाणे बदल करून सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास नक्कीच चागले उत्पादन मिळेल याकडे कुलगुरुंनी लक्ष वेधले. यासाठी कृषि संशोधन केंद्र, वडगांव मावळ येथील भात पैदासकार व इतर शास्त्रज्ञ मदत करतील अशी ग्वाही दिली.
दरे गावातील वातावरण व नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करता तेथे औषधी वनस्पती लागवड व नैसर्गिक शेती करणे सोयीचे असल्याने त्यामुळे फायदा होईल, यासाठी त्याक्षेत्रातील आयुष मंत्रालयातील तज्ञ डॉ. दिगंबर मोकाट यांचे मार्गदर्शन घेणेबाबत चर्चा झाली. तदनंतर वातावरणातील बदलांबाबत पुर्व सुचना मिळावी यासाठी अद्यावत स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी, कांदाटी खो-यातील हवामान रेशीम उद्योगास पुरक असल्याने शिवाजी विद्यापीठाचे जेष्ठ रेशीम तज्ञ डॉ. अधिकराव जाधव यांच्याशी संपर्क करुन त्याबाबत सुसंवाद घड्वुन आणावा अश्या सुचना दिल्या. नैसर्गिक शेती मधुन मिळणारे उत्पादन शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटाच्या माध्यमातुन ब्रॅडींग करुन विक्री केल्यास योग्य प्रकारे विपणन होईल व दरही चांगले मिळतील,असे प्रतिपादन केले.
यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत कृषि विज्ञान केंद्र बोरगांव येथील शास्त्रज्ञ व उपस्थित तज्ञांनी परिसरातील शेततळे व त्यातील मत्सव्यवसाय, शेळी पालन युनिट, आंबा व चिकु लागवड इतर फळबागेची पाहणी केली व आवश्यक सुचना केल्या. देशी गाई संगोपन करत असताना त्यामधुन व्यावसायिक उत्पादन घेणेसाठी कृषि महाविद्यालय, पुणे येथील डॉ. सोमनाथ माने यांच्याशी संपर्क करुन पुढील वाटचाल करणेत येईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी दापोलीचे कृषि विद्यापीठाचे निवृत्त मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुभानजी ढाणे यांनी शेततळ्यातील मत्सपालन व फळबाग जोपासना याविषयी माहिती दिली. तदनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र सरकाळे यांनी कांदाटी भागात या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार नवीन उपक्रमाचा जिल्हा बॅकेच्या पतपुरवठा धोरणामधे समावेश करुन शेतक-यांना मदत करणार असल्याबद्द्ल तसेच कृषि पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारख्यान्याचे ऊस विकास अधिकारी श्री. नेताजी पवार यांनी परिसरातील एरंडी चा बायोडिझेल साठी वापर करण्याचा मुद्दा मांडला, यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.