अनियमित कारभार करूनही निलंबन नाही; पालकमंत्र्यांकडे चौकशीची तक्रार
नीरा :
गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जयेंद्र सुळ यांनी कारभार स्वीकारल्यापासून विविध कामातील अनियमितता, अतिक्रमण व विकास कामातील त्रुटींवर दाखल तक्रारींवर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्तावित केली होती. सुळ यांना निलंबित करण्याची मागणी वारंवार करून देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचे मत तक्रारदारांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे भ्रष्ट कामकाज करणाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे बळ मिळत आहे.
येथील अतिक्रमणे निष्कसित करण्यास टाळाटाळ करणे, रस्त्यांची दप्तरे अपूर्ण ठेवणे, हिशोबात अनियमितता असणे, लाखोंची विकासकामे दुसऱ्याच जागेत करणे, मालमत्ता राजिस्टरला अस्तित्वात नसलेल्या घरांच्या नोंदी घेण्याचे पराक्रम सुळ व सरपंचांनी केले होते. सरपंच संभाजी कुंभार यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. मात्र, ग्रामसेवकांवर अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निगडे व नीरा गटाचे काँग्रेस पक्षाचे नितीन निगडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सहा मुद्द्यांवर तक्रार दाखल केली होती. त्यावर चौकशी अंती तथ्य आढळल्याने सुळ यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, सुळ यांच्यावर गंभीर आरोप असतानाही प्रशासकीय अधिकारी मात्र किरकोळ शास्ती करण्याच्या नादात असल्याने न्यायव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, याबाबत तक्रारदारांनी आता मुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांना तक्रार दिली असून आगामी काळात यावर काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे.
सीईओ गप्प का ?
यापूर्वी अतिक्रमण, अनियमितता, आर्थिक अफरातफर, बोगस माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात दंड थोपटून कारवाई करणारे सीईओ आयुष प्रसाद मात्र गुळुंचे प्रकरणात गप्प आहेत. त्यामुळे या प्रकरणात ग्रामसेवकांना वाचविण्यासाठी राजकीय दबाव वाढत आणल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
“गेल्या पाच महिन्यांपासून प्रशासन निलंबनाची कारवाई करत आहे. प्रस्ताव केवळ खालीवर केला जात असून मुद्दाम आमचा वेळ वाया घालवला जात आहे. गंभीर आरोप असतानाही कारवाई होत नसल्याने प्रशासकीय कामकाजवरील आमचा विश्वास उडत असून आम्ही आता लक्ष घालण्याबाबत दादांना विनंती केली आहे.” – अक्षय निगडे, गुळुंचे.
“याबाबत सोमवारी निर्णय घेऊ व आवश्यक ती सर्व कारवाई करणार आहे.” – संदीप कोहिणकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद पुणे.