उंब्रज – प्रतिनिधी :
त्रिवेणी संगमावर वसलेल्या उंब्रज गावच्या पुण्यभूमीत भगवान महाराजांचे आगमन झाले , ते नक्की कधी , केव्हा ? याची पुरेशी माहिती नाही , तसेच त्यांचे नाव , गाव ,जात , कुळ याविषयी सविस्तर माहिती नसली तरी , साधारण १८९६ च्या प्लेग च्या साथीच्या आसपास च्या काळात त्यांचे आगमन झाले असावे असे बोलले जाते. दिवस-रात्र ते तारळी व मांड नदीच्या संगमात अजपेची परीक्रमा करत असत , कधी कधी ते तासन तास आभाळाकडे पाहत राहायचे , निवांत स्थळी ते आत्मक्लेश , देहदंडाची , हटयोगाची साधना अन्न-पाण्याशिवाय करत असत. ते कुणाशी जास्त बोलत नसत आणि अंगावर लंगोट सोडले तर जास्ती वस्त्र परिधान करत नसत , त्यांच्या सतत मौन धारण करण्याच्या वृत्तीमुळेच त्यांचे नाव मौनी बाबा पडले होते.
भगवान महाराजांनी पुढे शिष्य परंपरा केली नाही , ” मी एक प्रवेशद्वार आहे ” साधकाला या प्रवेशद्वारातून राऊळात जाऊन राघवाची भेट घ्यायची असते अशी त्यांची धारणा होती. ते जादा बोलत नसत किंवा त्यांनी कधी समाजाला जास्तीचे प्रबोधित केले नाही , मठात असताना लोकं त्यांना भेटण्यासाठी , आपल्या अडचणी सांगण्यासाठी येत असत तेव्हा कधी कधी बाबा मोठ्याने कर्कश्य आवाज काढून त्यांच्या अंगावर धावून जायचे तर कधी कधी ते स्तब्ध व निश्चल-शांत राहत असत. महाराज रागावले की त्यांचा आशीर्वाद मिळाला व स्तब्ध राहिले तर त्यांची कृपा नाही झाली अशी धारणा भाविकांची असे. बऱ्याच भाविकांना त्यांच्या कृपाप्रसादाचा विलक्षण अनुभव आला होता , त्यामुळे भक्तांचा ओढा त्यांच्याकडे सतत वाढत होता , दिवसामागून दिवस गेले , असेच होळी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस , मठात पश्चिमे कडील भिंतीला टेकून बसले असता त्या अवस्थेतच ते ब्रम्हीभूत झाले , गावातील लोकांनी व भक्तांनी खड्डा काढून त्यांच्या विधीयुक्त समाधीचे बांधकाम केले , उन्मनीचे ऐश्वर्य भोगणार्या योगिराजाला भावीकांनी व ग्रामस्थांनी साश्रुपूर्ण नयनांनी व जड अंत:करणाने अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.
असे हे स्वामी समर्थांची शिष्य परंपरा असलेले प.पू.मौनी दिगंबर भगवान महाराज यांच्या मठात , महाराजांचा उथापन विधी , वज्र्यलेप विधी , प्राणप्रतिष्ठापना विधी , तिथीप्रमाणे पुण्यतिथी व महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.