महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (काेरेगांव)
गाव करील ते राव काय करील या उपमेला साजेसे काम करत क्रांतीकारी कुमठे गावच्या ग्रामपंचायतीने काेराेना विराेधी लढ्यात क्रांतीकारक पाऊल उचलत गावातील रुग्णांसाठी 4 बेडचे काेराेना केअर सेंटर उभे केले आहे.
कुमठे (ता. काेरेगांव) ग्रामपंचायतीने गावचे सुपूत्र व पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या संकल्पनेतून गावातील काेराेना बाधीतांसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही याेजना हाती घेवून अवघ्या एकाच दिवसाच्या नियाेजनानंतर 4 ऑक्सिजन यंत्रणेसह रुग्णांसाठी स्वतंत्र चार बेड, कर्मचाऱ्यांच्यासाठी पीपीई किट, तपासणी उपकरणे खरेदी करून चक्क गावातील मुरलीधर मंदीरात सुसज्ज असे काेराेना केअर सेंटर उभे केले आहे.
गेल्या काही दिवसात कुमठे गाव काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरले हाेते, शंभरच्या वर या गावातील रुग्णांची संख्या गेल्यानंतर नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली हाेती, रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन वाचून गावातील काही नागरिकांना मृत्यूही पत्करावा लागला यावर मात करण्यासाठी कुमठे ग्रामपंचायतीने काेराेना हटावचा नारा देत एक टास्क फोर्स राबविण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी सभापती राजाभाऊ जगदाळे यांनीही लागेल ती मदत दिली.
गावातील तरुणांनी याकामी माेठी जनजागृती केली. महिला एकत्र आल्या. त्यातून गावातच काेराेना केअर सेंटर उभारण्याचा निर्णय गावच्या सरपंच साै. रत्नमाला क्षीरसागर, उपसरपंच जितेंद्र जगदाळे व त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांनी घेतला. तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रविंद्र जाधव, तडवळे आराेग्य केंद्राचे डाॅ. सागर वाघमारे, डाॅ. राजीव अरलुरकर, डाॅ. नितीन जाधव यांनी या काेराेना केअर सेंटरसाठी मार्गदर्शन केले आणि सर्वांच्या प्रयत्नातून अखेर कुमठे गावात मिनी काेव्हीड सेंटर सुरू करण्यात आले. या काेराेना केअर सेंटर मुळे कुमठे गावातील नागरिकांना काेरेगाव, सातारा या ठिकाणी हाॅस्पिटलमध्ये बेड उपलब्ध हाेईपर्यंत त्यांना विना माेबदला ऑक्सिजन, प्राथमिक औषध उपचार, वाारा आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या मनातील भीती, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तज्ञ डाॅक्टरांची टिमही इथे उपलब्ध असणार आहे.
कुमठे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे काेराेना विराेधी लढ्यात कुमठे गावचे एक क्रांतीकारक पाऊल पडले आहे. या काेराेना केअर सेंटरचे लाेकार्पण आज कुमठे गावच्या सरपंच साै. रत्नमाला क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.जितेंद्र जगदाळे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब बर्गे, उपसरपंच जितेंद्र जगदाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आराेग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित हाेते.