वाई : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वाईतील मधली आळी गणेशोत्सव मंडळाने कोविड संकटामुळे आलेली परिस्थिती स्वीकारून सलग दुसऱ्या वर्षी साजरा केला आगळावेगळा उत्सव साजरा केला.
गणेशोत्सव म्हणजे उत्साह, जल्लोष आणि भव्यदिव्यता. मात्र गेले दोन वर्षे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करणे, मिरवणूक, सजावट, कार्यक्रम, देखावे करण्यास सक्त मनाई आहे. मात्र मधली आळी गणेशोत्सव मंडळाने या संकटावर मात करीत सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जे सोशल मिडियावरून अनेकांनी पाहिले आणि प्रतिकुल परिस्थितीतही उत्सवाच्या उत्साहावर विरजण पडू दिले नाही.
ऑनलाइन कार्यक्रम आणि सलग दुसऱ्या वर्षी सादर करणारे मधली आळी गणेशोत्सव मंडळ शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील एकमेव मंडळ असावे.
सोमवार दि. १३ सप्टेंबर रोजी प्रा.डॉ. नितीन कदम यांनी करियर निवडण्यासाठी फिंगरप्रिंट टेस्ट चे महत्व या विषयावर कमी वेळात नेमके आणि सखोल मार्गदर्शन केले. करियर निवडताना होणारी चूक ही आपले पूर्ण भविष्य बदलून टाकते, त्यामुळे या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आपल्या पाल्याचा कल ओळखून योग्य दिशा दिल्यास त्यांची मोक्याची वर्षे वाचतील आणि कष्ट आणि पैसाही वाचेल, असेही ते म्हणाले.
भविष्यात कोरोना निर्बंध उठल्यानंतर असा एक कार्यक्रम गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा मनोदय अध्यक्षांनी व्यक्त केला.
मंगळवार दि. १४ रोजी प्रसिद्ध वकील व वक्ते ऍड.उमेश सणस यांनी आग्र्याहून सुटकेला ३५५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्त तो संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. त्यावेळची परिस्थिती, महाराजांनी मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, राजकारण आणि हुशारीने मृत्यूच्या जबड्यातून एकही मावळ्याच्या जीवाला धोका पोहोचू न देता केलेले पलायन हे जगाच्या इतिहासात एकमेव आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बुधवार दि.१५ रोजी युवा कीर्तनकार ह.भ.प ओंकार कानडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
गुरुवार दि.१६ रोजी डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी व्यक्तीचित्रण सादर केले. आपल्या खुमासदार शैलीत लिहिलेली दोन पूर्णपणे वेगवेगळ्या भागातील आणि व्यवसायातील माणसे त्यांनी हुबेहूब डोळयांसमोर उभी केली.
शुक्रवार दि.१७ रोजी मूळच्या वाईकर असलेल्या व सध्या पुणे येथे स्थित असणाऱ्या सौ. लौकिका रास्ते यांनी कृष्णाकाठच्या मंदिरांची कथा- इतिहास व भविष्य या कार्यक्रमातून आपल्या जवळ असलेल्या दुर्लक्षित वैभवाची जाणीव करून दिली. आसपास असलेली मंदिरे आज दोनशे ते आठशे वर्षे होऊनही कशी भक्कम पणे उभी आहेत मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. आणि त्यासाठी फार काही न करताही संवर्धन कसे करता येईल ते सांगितले.
आपल्या मुलांना जसे बाकी संस्कार देतो तसे ह्या वैभवाची जाणीव आणि ते सांभाळण्याची जबाबदारी याचीही जाणीव आपण संस्कार म्हणून करायला हवी असे त्यांनी सांगितले.
यावेळी वाईतील मधली आळी कृष्णाबाई सेवा समिती आणि वाई कृष्णामाई सेवा समिती यांच्याकडून सुरू असलेल्या संवर्धन कार्याला मंडळाच्या वतीने कै. प्रसाद घाडगे स्मृतिप्रीत्यर्थ भरघोस निधी देण्यात येणार असून सक्रिय सहभाग नोंदवण्याचा मनोदय आनंद पटवर्धन यांनी व्यक्त केला.
शनिवार दि. १८ रोजी पुणेस्थित श्री. सुहास किर्लोस्कर यांनी संगीत संगत हा गाणे कसे ऐकावे, कोणते वेगळे विशेष वाद्य वाजवले आहे, ते कोणी वाजवले आहे आणि एकूणच संगीत कसे ऐकावे याची उदाहरणांसह उत्तम माहिती दिली.
मंडळाकडून एक दिवस पंच मंडळ, एक दिवस प्रतापगड उत्सव समिती आणि एक दिवस डॉ. घोटवडेकर हॉस्पिटलमधील कोरोना वॉरीयर्सच्या हस्ते आरती कोविड चे सर्व नियम पाळून करण्यात आली.
यावेळी कोविड योद्द्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
मधली आळी गणेशोत्सव मंडळ हे वर्षभर सक्रिय असणारे मंडळ असून गेले दोन वर्षे असलेल्या कोविड संकटात, पूर संकटात तसेच नुकत्याच पश्चिम झालेल्या नैसर्गिक आपत्तीत वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यात अग्रेसर होते. याशिवाय अनेक समाजोपयोगी कामे, घाट स्वच्छता, वृक्षारोपण अशा नेहमीच्या कार्यक्रमातही मंडळ कायम अग्रेसर असते व राहील अशी ग्वाही अध्यक्ष अमोल पटवर्धन यांनी दिली.
उत्सव पार पाडण्यास उपाध्यक्ष मंगेश खोत, मंदार पटवर्धन, मंदार चित्राव, अनिकेत जगताप, ओंकार कानडे, अनिकेत बोपर्डीकर, आशिष आदलिंगे, आनंद पटवर्धन, विजय जमदाडे, अमोल देव, श्रेयस मांढरे, अमोल थोपटे व सर्व तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





















