पाटण : कोविड-19 चा प्रसार रोखण्याचे आव्हान माझ्या भारत देशातील माता-भगिनींनी स्वीकारले, त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपण कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात यशस्वी आपण ठरतो आहोत. या सर्व माता-भगिनींनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून या ‘माऊली’ संपूर्ण देशवासियांच्या अभिनंदनास पात्र आहेत असे गौरव उद्गार सत्यजितसिंह पाटणकर यांनी महिला कोरोना योद्ध्यांचा सत्कार करताना काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने महिला कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या महिला कोरोना योध्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ सेवेसाठी, आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त १० जुन रोजी दरवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जातात. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे वेगवेगळे उपक्रम राबविता आले नाहीत. सध्या ‘लॉकडाऊन’ काही प्रमाणात शिथल करण्यात आले असले तरीही गर्दी करण्यास लोकांना मनाई आहे. त्यामुळे फक्त प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधी स्वरुपातील एका महिलेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गौरव करण्यात आला. कोविड-19 चा प्रसार रोखण्यात सर्व देश एकवटून काम करत असून, लॉकडाऊनचे पालन करत गेल्या काही महिन्यांपासून देशातले सर्व लोक घरात राहत आहेत. त्यासोबतच संपूर्ण मानवतेच्या हितासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता, कोरोना योद्धे पहिल्या फळीत भक्कमपणे उभे राहून लढा देत आहेत. या सर्व योद्ध्यांमध्ये महीलांचा सहभाग खुप मोठ्या प्रमाणात आहे. या रागिणींचे साहस, निस्वार्थ त्याग आणि कोरोनाच्या कर्तव्याप्रती समर्पण भावना, या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने २२ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून त्यांचा पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व महिला कोविड योद्ध्यांचे कौतुक केले व त्यांच्या सेवेसाठी आभार मानले. यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकर घाडगे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा सौ. रोहीणी शिर्के-पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गुरुदेव शेडगे, माजी जि.प.सदस्या सौ. कदम, महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर, आशा सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. याप्रसंगी पाटणकर यांनी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी पुढे बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, कुटुंबावर एखादे संकट आले की त्या घरातील स्त्री त्या संकटासमोर खंबीरपणे उभे राहून त्या संकटाशी दोन हात करुन ते संकट परतावून लावते. आज कोरोना सारखं मोठं संकट आले आहे नेहमीप्रमाणे या ‘माय-माऊली’ आपलं घर, आपला गाव, आपलं राज्य आणि आपला भारत देश वाचवण्यासाठी कोरोना विरुद्धच्या या लढाईत आघाडीवर आहेत. यामध्ये महिला डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय महिला कर्मचारी, महिला सफाई कर्मचारी, महिला पोलीस आणि सध्या अविरत काम करत असून, या कसोटीच्या काळात, देशातील नागरिक सुरक्षित राहावेत आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात, याची दक्षता त्या घेत आहेत. त्यांचे श्रम आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळेच आपण कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले आहे. आता जेव्हा देश काही निर्बंध शिथिल करण्याची तयारी करत आहे, त्यावेळी या युद्धात लढणाऱ्या या महिला कोरोना योध्यांचे सर्व प्रथम आभार मानूया. कोरोनाविरुद्ध सुरु असलेली ही लढाई आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



















