संतोष भोसले महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी,वडगाव निंबाळकर,
लाॅकडाऊनच्या काळात गोरगरिबांसाठी सरकारने दिलेला गहू-तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे उघडकीस आला असूून याप्रकरणी दोन जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळ्या बाजाराने खरेदी केलेला रेशनचा माल खुल्या बाजारात विक्रीसाठी घेउन जाणारा टेम्पो उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवार दि.१९ दुपारी निरा बारामती मार्गावर होळ (ता.बारामती) येथील आठफाटा भागात पकडला. यामध्ये १८ हजार ७०० रूपये किंमतीचा गहु १७ पिशव्या, ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा तांदुळ ३५ पिशव्यात भरून एम एच ४२ एम ६३०८ यानंबरच्या टेम्पोत भरून वडगाव निंबाळकर वरून तरडगावच्या दिशेने घेउन चालला होता. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. शहानिशा करण्यासाठी सापळा लावला असता निरा-बारामती मार्गावर रेशनचा माल घेऊन जाताना रंगेहाथ पकडण्यात आले. माल रेशनिंगचा असल्याची खात्री करण्यासाठी नायब तहसीलदार महादेव भोसले उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, तलाठी रविंद्र कदम कोतवाल बाळासो करचे यांच्या समक्ष पंचनामा करून टेम्पो सह २ लाख ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. टेम्पोचालक शशिकांत कदम रा.चोपडज ता. बारामती आणि दुकानदार शशिकांत शहा रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.