महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
बारामती तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून सन २०१३ पासून चोरीस गेलेल्या ३१ मोटार सायकली कर्नाटक राज्यातून केल्या हस्तगत केल्या आहेत. सदर मोटरसायकल चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मागील ३ ते ४ महिन्यापासून सुर्यनगरी,एमआयडीसीसह बारामती शहरातील आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते ,उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी बैठक घेवून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडीच आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्या गुन्हे शोध पथकास सदरची जबाबदारी दिली होती. त्यानुसार अत्यंत गोपनीय रित्या बारामती तालुक्यातील मोटार सायकल चोरीचे रेकाॅर्ड वरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले तसेच तांत्रिक मदत घेवून संशयीत म्हणून अजित दशरथ आगरकर (रा.बेलवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे) याला ताब्यात घेतले.
व वेगवेगळया युक्त्या वापरून त्याला बोलते केले. असता त्याने बारामती शहर व आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरून त्या कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या गावात विक्री केल्याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारावरून सदर गुन्हे पथकाची टीम कर्नाटकात दाखल झाली. मात्र लाॅकडाउन असल्याने तसेच स्थानिक भाषा येत नसल्यामुळे अनेक अडथळे आले तरीसुद्धा सदर गुन्हे शोध पथकाने रात्रंदिवस चिकाटीने प्रयत्न करून चोरीस गेलेल्या पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या ३१ मोटरसायकली वेगवेगळ्या गावातून हस्तगत केल्या.
सदर हस्तगत केलेल्या मोटार सायकली बारामती तालुका पोलीस स्टेशन,बारामती शहर पोलीस स्टेशन,वालंचदनगर पोलीस स्टेशन हददीतून चोरीस गेल्या होत्या. सदर आरोपी हा मोटार सायकल चोरीत सराईत असून तो हॅण्डल लाॅक तोडून व बनावट चावी वापरून मोटार सायकल चोरत होता.त्या मोटार सायकली कर्नाटक राज्यात नेवून वेगवेळया गावात मिळेल त्या किंमतीला विक्री करत होता.
या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) यांनी ३०,००० रुपयाचे बक्षीस संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर केले आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,सहा.फौ.दिलीप सोनवणे, पोलीस काॅस्टेंबल नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, होमगार्ड सचिन गायकवाड, शेखर आदलिंग,पोलीस मित्र मच्छिंद्र करे यांनी केली आहे.






















