सातारा : जावली तालुक्यातील अवैध दारुविक्रीमुळे नागरिकांच्या संसाराची वाताहात होत आहे. या अवैध धंदेवाल्यांविरोधात आम आदमी पक्षाने दंड थोपटले असून त्यासाठी आम आदमी पक्षाच्यावतीने पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर आणि जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव व पदाधिकार्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
याबाबत निवासी जिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, रतन पाटील, जिल्हा खजिनदार विजयकुमार धोतमल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती शिंदे, जिल्हा सल्लागार सदस्य एडवोकेट मंगेश महामुलकर, जिल्हा सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे शहर उपाध्यक्ष सादिक शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोगावकर यांनी साखळी उपोषणासंदर्भात जिल्हाधिकारी यांना मागील महिन्यात निवेदन दिले होते. याबाबत बोलताना सरदार (सागर) भोगांवकर म्हणाले, सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम दारुबंदी राबविणार्या जावली तालुक्यात चक्क दारुचा महापूर वाहत आहे. मात्र याबाबत पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ असून याविरोधात कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच जिल्ह्यात हा गोरखधंदा चालू असल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्चर्याची भावना आहे. दारुच्या बाटलीच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट भावाने येथे सर्रास दारुविक्री केली जात आहे. दारुच्या व्यवसायातून भरपूर पैसा हाती पडत असल्याने या धंद्याकडे व्यावसायिकांचा कल वाढतच चालला आहे. जावली तालुक्यातील काहींचा तर हा पिढीजात धंदा बनला आहे. त्यांचे पाहून इतर लोकही या धंद्यात पैशाच्या लालसेने उतरत आहेत. धंदा सुरु ठेवण्यासाठी खाकी ला गोंजारावे लागते. त्यापद्धतीने येथील पोलिसांचेही हप्ते बांधले गेले आहेत. शिवाय एखादी टुकार कारवाई दाखवून हे लोक वरिष्ठांकडून आपली पाठ थोपटून घेत असतात, हे वेगळेच. म्हणजेच जावली तालुक्यात अवैध दारुविक्री करणार्यांना पोलिसांनीच अभय दिल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव म्हणाले, जावलीतील रणरागिनींनी मतदानाच्या, आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील उभी बाटली आडवी केली. मात्र काही दु:ष्प्रवृत्तींनी काही खाकीधारकांना हाताशी धरुन आडवी बाटली कधी उभी केली हे कोणाला कळालेच नाही. त्यामुळे येथे तळीरामांना सहजरित्या दारु उपलब्ध करुन देणार्या आणि हजारो परिवारांची या माध्यमातून वाताहत करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात यावे. जेणेकरुन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. येथे मेढा पोलीस ठाण्यांतर्गत होणार्या कारवाया या जुजबी स्वरुपाच्या असल्याने कारवाई झाल्यानंतर केवळ काही तासांतच पुन्हा तो अवैध धंदेवाईक आपला धंदा उभा करतो. यासाठी येथे सक्षम अधिकारी नेमण्यात यावा. जावली तालुक्यात परवानाधारकच ‘माल’ टाकत असल्याने परवानाधारकांवरही कडक कारवाई करुन त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा. याचबरोबर कारवाई करण्यात आलेल्यावर मोक्का अथवा तडीपारी सारखी कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरुन संपूर्ण जावली तालुक्यात अवैध दारुविक्री करण्यास कोणी धजावणार नाही.
आज सुरु झालेले साखळी उपोषण लेखी आश्वासनाशिवाय माघारी घेणार नसल्याचेही त्यांनी सांगत जावली तालुक्यात चालणारे बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यापेक्षाही उग्र आंदोलन आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आम आदमी पक्षाच्या सातारा पदाधिकार्यांनी दिला. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, रतन पाटील, जिल्हा खजिनदार विजयकुमार धोतमल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती शिंदे, जिल्हा सल्लागार सदस्य एडवोकेट मंगेश महामुलकर, जिल्हा सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















