बारामती तालुक्यातील धक्कादायक प्रकार
बारामती – धाकट्या भावाने घराच्या वादातून मोठ्या भावाला तू वेगळा रहा. तू आमच्यात राहू नकोस. या कारणावरून झालेल्या वादामधून पेट्रोल अंगावर ओतून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार काळखैरेवाडी तालुका बारामती येथे घडला. या प्रकरणी मारुती वसंत भोंडवे वय -४० यांनी दि.१२ ऑगस्ट रोजी याबाबतची फिर्याद वडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सदर व्यक्तीचा उपचार सुरु असताना आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सदर घटनेची हकीकत अशी की, मयत मारुती भोंडवे व त्यांची पत्नी, दोन मुले पत्र्याच्या घरात राहत असताना आरोपी अनिल वसंत भोंडवे (वय ३२) हा मयत मारुती भोंडवे यांना म्हणाला की, तुझा तू वेगळा रहा, तू आमच्यात राहू नको या झालेल्या वादातून आरोपीने फिर्यादीच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. पेट्रोलने अंगवरील पेटलेले कपडे विझवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या फिर्यादीच्या पत्नीलाही ठिकठिकाणी भाजले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. सदर घटनेचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.