मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रति येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्यात १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला, वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्धता
वन्यजीव म्हणजे केवळ वाघ नाही तर वाघ केवळ एक प्रतीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या जंगलात वाघ असतो ते जंगल पूर्ण असते. जंगल पूर्ण असणे हे जीवसृष्टीचे एक मोठे जीवनचक्र आहे. त्याचे रक्षण करणे, त्याबद्दल जाग आणण्यासाठी या सप्ताहाचे महत्त्व अधिक आहे. वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाची हीच जाग जपत या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत जवळपास ८०० चौ.कि.मी चे आरेचे जंगल आरक्षित करण्याचा प्रस्ताव त्याच उद्देशाने आणल्याचे व हे जंगल आरक्षित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राला संपन्न जैवविविधता
राष्ट्रीय उद्याने अनेक ठिकाणी आहेत परंतु मुंबई महानगरात शहराच्या मधोमध वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे जंगल आहे जिथे निसर्गत: वन्यजीव, पशुपक्षी, कीडे, फुलपाखरं आणि असंख्य जीवजंतू आहेत. जीवसृष्टीचे चक्र पूर्ण करणारे हे जंगल आहे, शासन त्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राला विपुल जैवविविधता लाभल्याचे सांगताना त्यांनी ७२० कि.मी च्या समुद्र किनारी भागातील जीवसृष्टी जपायलाही शासनाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
केवळ औपचारिकता नको
असे सप्ताह किंवा दिन साजरे करताना त्यातील औपचारिकता काढून टाकून ते मनापासून साजरे झाले तर आयुष्याला एक वेगळी कलाटणी आणि दिशा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, वन्यप्राण्यांसोबत असलेले आपले सहजीवन, त्यांचे आपल्या आयुष्यातील अस्तित्व आपण मनापासून स्वीकारणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन काळात अनेक गोष्टी आपल्याला दिसून आल्या… गाड्या, यंत्रांच्या खडखडाटात कधीही ऐकू न येणारी पक्षांची किलबिल आपल्याला ऐकू येऊ लागली, कधीही न दिसणाऱ्या चिमण्या दिसून येऊ लागल्या. आपण आपल्या घराच्या गच्चीत किंवा गॅलरीत गेलो तर आपली नजर दूरपर्यंत जाऊ लागली, कारण मधले प्रदूषण नाहीसे झाले, अशी अनेक उदाहरणेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना दिली.
सहजीवन गरजेचे
माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राज्यभर राबविण्यास सुरुवात केल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले की, कुटुंब सुरक्षित तर आपला समाज सुरक्षित राहणार आहे. याच पद्धतीने आपल्या कुटुंबाचा एक भाग असलेल्या परंतु वनात राहात असलेल्या, जीवसृष्टीत राहात असलेल्या आपल्या या जीवनसाथींचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. संपन्न पर्यावरणासाठी ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाप्रति या सप्ताहाच्या निमित्ताने येणारी जाग केवळ एका सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता आयुष्यभरासाठी जपूया, सजग राहून सहजीवनातून आपल्या आयुष्यातील आनंद वाढविण्यासाठी कटिबद्ध होऊया असेही ते म्हणाले.