महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:प्रतापसिंह भोसले(फलटण शहर )
सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर १७ ते २० रूपये दूध दर दिला जातो. दूध उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत.त्यांना प्रति लिटर रक्कम रुपये पाच प्रमाणे अनुदान देण्याविषयी चे निवेदन सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेने दिले.
विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रूपये झाले आहे.याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात 19 लाख लिटरने घट झालेली आहे. सन 2018 मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर 5 रूपयेचे अनुदान जाहीर करून 700 कोटी रूपयेचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील 46 लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास 5 रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो 50 रूपये अनुदान देण्यात यावे. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे. या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. माय बाप सरकारला जाग आलेली नाही. उत्पादन खर्चापेक्षा १० रूपये कमी दराने शेतकर्यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान देऊन २५ रूपये लिटरला भाव द्यावा,या मागणीसाठी आम्ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी जनावरांसहित आलो आहोत. आपणांस विनंती की, आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवून शेतकर्यांच्या दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू.असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या वेळी श्री. धनंजय महमूलकर, सचिन शेळके, डॉ. घाडगे, नितीन यादव, सचिन खानविलकर, प्रमोद गाडे, दादा जाधव आदी उपस्थित होते.