युनियन बँक ऑफ इंडियाने गेल्या आठ वर्षात बड्या थकबाकीदारांची सुमारे 26 हजार 072 कोटी रुपयांची थकीत कर्जे निर्लेखित( राईट ऑफ) केली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता बँकेने दिली आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात दरवर्षी 100 कोटीपेक्षा अधिक थकित कर्ज असलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या निर्लेखित केलेल्या कर्जखात्याची नावे आणि त्यांच्या मार्च 2020 पर्यंतच्या वसुलीची माहिती मागवली होती.
केंद्र सरकारने कर्जवसुलीसाठी कठोर कायदे करूनही बँका त्याची अंमलबजावणी करत नाहीत. उलट कर्ज निर्लेखित करून एनपीए कमी दाखविण्यात बँकांना रस आहे. किंवा कर्ज वसुली न करण्यात गुंतलेले हितसंबंध उघड होऊ नये यासाठी बँका मोठ्या थकबाकीदारांची माहिती देणे टाळत आहेत. विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच, पुणे
त्यावर बँकेने बड्या कर्जदारांची 26 हजार 072 कोटी रुपये कर्ज निर्लेखित केल्याचे कळवले आहे. परंतु निर्लेखित केलेल्या कर्जाची वसुली किती झाली याची माहिती बँकेने दिलेली नाही.ही माहिती वर्गीकृत आणि संकलित करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागेल. त्यामुळे माहिती देता येत नाही असे कळवले आहे. तसेच बड्या कर्जदारांची नावेही गोपनीयतेच्या नावाखाली बँकेने दिले नाहीत. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा ,महाराष्ट्र बँक यांनी निर्लेखित केलेल्या कर्ज खात्यांच्या वसुलीची माहिती सहजपणे उपलब्ध करून दिली होती. तीच माहिती देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाला कोणते वेगळे कष्ट घ्यावे लागणार आहेत असा तिरकस प्रश्न विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.