श्री शरद पवार यांचे गेल्या ५० वर्षातले राजकारण हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय. मात्र ते सतत निवडणूक सज्ज असतात याबाबत कोणाचं दुमत असणार नाही. ते इलेक्शनहोलीक आहेत. श्री. प्रशांत किशोरच नाही तर ना. अमिन शहा, फडणवीस, खडसे यांच्या भेटी पासून त्यांना २०२४च्या निवडणुकीचे वेध लागलेत. यात काँग्रेस काय कसं, कमवू शकते , शिवसेनेची परिस्थिती काय असेल याचा या लेखात घेतलेला धांडोळा.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे. त्यापूर्वी श्री. देवेंद्र फडणवीस – श्री.शरद पवार. श्री. खडसे – श्री . शरद पवार.त्यानंतर श्री. प्रशांत कीशोर- श्री.शरद पवार यांच्या गाठीभेटीने आठवडा गाजबजला. यात भेट झाली की नाही याबाबत हा लेख लिहित असताना संदेह असलेली आणिक एक भेट म्हणजे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार आणि श्री.राम शिंदे यांची भेट होय. वरवर पाहता यातील बहुतेक गाठीभेटी या प्रकृतीची चौकशी आणि सदिच्छा भेट या कारणास्तव घेतली, घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र या भेटी दीर्घकाळ चालणाऱ्या आणि मग बंद दारा आड का , असाही प्रश्न उपस्थित होतो . असे असले तरी या भेटी राज्याच्या तसेच देशाच्या भविष्यकालीन राजकारणात बीजारोपणाची तयारी सुरू करत आहेत हे नक्की!
तयारी निवडणुकीची
गेल्याच आठवड्यात आणखी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिना निमित्त पक्षाध्यक्ष श्री. शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना केलेले संबोधन.!खरतर सलग 22 वर्ष एकाच पक्षात राहण्याची श्री.शरद पवार यांची ही पहिलीच वेळ .त्यापूर्वी त्यांच्या २८ वर्षे किंवा त्याहून अधिक कालखंडाच्या राजकारणात त्यांनी पक्ष बदलण्याचे प्रयोग करून पाहिले. त्यांचे हे प्रयोगाचे भाग मी सकारात्मक मानतो. घेतो. पक्षांतरे, विविध पक्षांच्या आघाड्या करण्याची प्रायोगिकता आजही ते करत आहेत. प्रायोगिकता जपून आहेत.याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वबळावर सत्ता मिळवणे हे त्यांचे स्वप्न अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे खरं तर यापुढे अजून वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी,युतीची प्रयोगशील वृत्ती ते सोडून देतील असेही अजिबात वाटत नाही. अगदी भारतीय जनता पक्षालाही त्यांनी वेळोवेळी साद घातलेली आहे. सोबत येण्याची तयारी दाखवली आहे.थोडक्यात त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत समन्वय असेल असेलच असेही फारसे होत नाही . हे ही अनेकदा सिद्ध झाले आहे.याबाबत फार कोणी टोकाचे विरोधी मत व्यक्त करेल असेही वाटत नाही.श्री. शरद पवार यांच्या डोळ्यासमोर दोन, तीन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा पट आहे .आणि त्या पटावरच्या मोहऱ्यांना हलवण्याचा किंवा त्या संदर्भातल्या त्यांच्या हालचालींना त्यांनी प्रारंभ केला आहे. वर उल्लेख केलेल्या गाठीभेटी त्याचाच प्राथमिकोत्तर भाग आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकी अगोदरचा हा मधला काळ; सार्वत्रिक लोकसभा,विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी योग्य आहे हे नक्की. सध्याच्या धोरणात काही गमावले जात असेल तर आगामी दोन-तीन वर्षात ते हस्तगत करण्याच्या दृष्टीने हा वेळ श्री.पवार यांना पुरेसा आहे. त्या अनुषंगाने श्री. प्रशांत किशोर यांची भेट हा महत्त्वाचा टप्पा आहे. थोडक्यात सध्याचा कारभार सुरळीत करण्यापेक्षा, चालवण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची ही तयारी सुरु झाली आहे.
वारसांसाठी भक्कम पाया
एकीकडे महाआघाडीतले सहयोगी पक्ष ;शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही आपापल्या व्यापात गुंतलेले आहेत.शिवसेनेला मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.एकवेळ मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड केली जाईल, पण मुंबई महापालिकेवरची पर्यायाने मुंबईवरची हुकुमत गमवायला शिवसेना अर्थातच श्री.उद्धव ठाकरे तयार होणार नाहीत. शिवसेनेची अजून तीन वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत स्वताःच्या अस्तित्वाची लढाई असेल. यदा कदाचित सध्याचे सत्तेचे गणित दोन्ही काँग्रेसपैकी कोणी उलटवले तर अपयशाचे धनी या बिरुदावलीतून त्यांना एकट्यालाय बाहेर पडावे लागण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. मुंबई हेच, एवढेच कार्यक्षेत्र त्यांना उरेल.
काँग्रेसमध्ये अंतर्गत दुही आहे. नसेलही पण एकजिनसीपणा ही नाही. महाराष्ट्राला सबळ,सक्षमपणे इतर पक्षांपुढे काँग्रेसला ठामपणे उभे करता येईल, गतवैभवाकडे नेईल असा नेता सध्यातरी काँग्रेसमध्ये नाही. श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे एक सुज्ञ सुजाण आणि उर्वरित तिन्ही पक्षांनी दखल घ्यावी असे नेतृत्व काँग्रेसमध्ये आहे. कदाचित ते मासलिडर नाहीत असा एक शिक्का त्यांच्यावर मारला जातो. पण राज्य चालवण्याचा, आपल्या स्पर्धकांना मर्यादेत ठेवण्याची त्याची क्षमता नक्कीच आहे.मात्र सध्याची राज्याची काँग्रेसची धुरा ज्या व्यक्तिमत्वाकडे काँग्रेस हायकमांडनी सोपवली आहे ,त्यावरून काँग्रेस पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये चौथ्या स्थानावर राहील यात आज मितीस शंका नाही. महाविकास आघाडीची उर्वरित दोन पक्षांची ही पार्श्वभूमी विचारात घेता श्री. शरद पवार यांनी श्री. प्रशांत किशोर यांना बोलावून जी तीन तास चर्चा केली ,ती राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेस आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळावे यासाठी नक्कीच असेल असे वाटत नाही. असणारही नाही. पक्षाचा विस्तार आणि त्याचा पाया श्री. पवार यांना भक्कम करायचा आहे. तो भक्कम करून दीर्घकाळ आपल्याच घरातल्यांच्या ताब्यात राहील एवढा राष्ट्रवादी पक्ष सक्षम करायचा आहे. वर्धापन दिनी भाषणात त्यांनी जी विधाने ,भविष्यकाळातल्या नियोजनाची केली; ती त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. ती साकारण्याचे स्वप्न आहे. आणि हे वैयक्तिक स्वप्न त्यांना त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्याच , त्यांना हव्या त्या व्यक्तींसाठी प्रत्यक्षात उतरवण्याची तीव्र इच्छा आहे. महाआघाडी ;भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असे श्री. पवार सांगतात. मात्र श्री.प्रशांत किशोर यांच्याशी निवडणूक व राजकीय व राजकीयव्युह रचनेबाबत केली गेलेली चर्चा ते एकटेच,वैयक्तिक पद्धतीने करतात. तीन तासाच्या चर्चेत एकदा प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांना उपचारा दाखल बोलवले जाते. तर श्री. रोहित पवार चर्चास्थानी कायम असतात .हा सगळा प्रकार सार्वजनिक, राजकीय जीवनात ज्यांच्याशी आघाडी केली त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतो. तसेच पवार घराण्यात सत्ता रहावी यासाठी आपल्या वारसांना (मग तो कोण ? सौ.सुप्रिया , श्री. रोहित की सौ.सुप्रिया सोबत श्री. रोहित पवारांना )बळ देण्याची त्यांची प्रक्रिया सुरु आहे. श्री. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असण्यात चुक काहीच नाही .श्री. नाना पटोले यांना तशी महत्त्वाकांक्षा असेल तर श्री. अजित पवार यांना का नसावी ? मात्र घरातूनच विरोध आणि प्रतिस्पर्धी निर्माण केले असतील तर श्री अजित पवार यांना त्यातच लढण्यात ,समजावण्यात तोंड देण्यात किंवा अन्य इतर कोणते मार्ग काढण्यात वेळ आणि शक्ती द्यावी लागेल. किंबहुना तो वेळ किंवा शक्ती वाया जावी अशीही खेळी असू शकते .पंतप्रधान श्री.मोदी आणि मुख्यमंत्री श्री. ठाकरे बंद खोलीत भेटू शकतात. तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिलेदारांना दारा बाहेर उभे करून ,तर श्री. पवार आणि श्री. प्रशांत किशोर सगळ्यांना बाहेर ठेवून का भेटू शकणार नाहीत ? श्री. शरद पवारांनी दबावतंत्रात त्याचा बंद दरवाज्याचा वापर केला.
भाषणात दुसरे महत्वाचे वाक्य म्हणजे,सत्ता एकाच हातात ठेवली जाऊ नये. असू नये. हे सांगत असताना ती पाच वर्ष ही एका हातात ठेवली जाऊ नये असा तर त्यांच्या सांगण्याचा अर्थ नाही ना.? याचा पुढचा भाग म्हणजे श्री. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आता कसातरी वर्षभर राहिला आहे हे सुचित केले गेले असा होतो. अडीच वर्षानी मुख्यमंत्रीपदी दुसरेच कोणी असेल असाही संकेत असू शकतो. पाच वर्ष श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असे श्री. पवार म्हणतात इथेच श्री. पवारांचे राजकारण पहाता धोका निर्माण होतो.
काँग्रेसला संधी
काँग्रेस पक्षाला मृतप्राय अवस्थेत जिवंत ठेवायचे आणि आणि शिवसेनेला आपल्या ताब्यात ठेवायचे.हे करत असताना शिवसेनेचे भाजपकडे जाण्याचे दोर कापायचे आणि काँग्रेसला कायमस्वरूपी त्रिशंकू अवस्थेत टांगून ठेवायचे हा धूर्तपणा शरद पवार अवलंबत नसतील ना अशीही एक शंका वाटते . उद्या, भविष्यात काँग्रेस, शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष यापैकी कोणाला सत्ता स्थापन करायची असेल तर सत्तास्थापन करतानाची पहिली आवड किंवा निवड राष्ट्रवादीच असली पाहिजे. अशी सुद्धा श्री. पवार यांची नीती असू शकते. सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रभागी इलाज-नाईलाजाने श्री. शरद पवार आहेत. काँग्रेसला राख झटकून, गतवैभव प्राप्त करण्यासाठी ताकदीने उभे राहण्याची आणि महाआघाडीच्या केंद्रस्थानी येण्याची आज मोठी संधी आहे .त्यासाठी निर्णय क्षमता वाढवणे एवढेच त्यांना करायचे आहे .सत्तेत असून नसल्यासारखीच सध्याची त्यांची परिस्थिती आहे .स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी सत्तेचा त्याग हे हुकुमी पान कसे वापरावे याचा विचार काँग्रेसच्या मंडळींनी आता केला तर काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात, महाआघाडीच्या निर्णय प्रक्रियेत केंद्रस्थानी येईल. तसेही एखाद्या सकाळी राष्ट्रवादी तसेच शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी महाआघाडीच्या जंजाळातून हात झटकून मोकळे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. समजा असे झाले नाही तरी विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटप, उमेदवार निश्चिती हा सगळ्यात मोठा पेचप्रसंग महाआघाडीलाच निस्तरावा लागणार आहे. लोकसभा,विधानसभेच्या जागांमध्ये तिघे वाटेकरी असतील उलट भाजपला या सगळ्या च्या सगळ्या जागा लढवण्यासाठी मिळणार आहेत. सहाजिकच इच्छुक आमदार सुद्धा आज जागावाटपाची गणिते मांडू लागले आहेत.आणि उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने योग्य त्या संधीच्या शोधात आहेत. यावरून होणारा संघर्ष हे, महाआघाडीच्या इतिहासातले संघर्षाचा एक अटळ अध्याय असेल. अर्थात राजकारणात कधी ही काहीही घडू शकतं.शत्रू, मित्र पूर्णपणे बदलू शकतात. हे गाठीभेटींचे अन्वयार्थ असतात.
तेंव्हा तूर्तास बास..!
.
मधुसूदन म. पतकी
कार्यकारी संपादक
सातारा




















