महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून ज्या मुद्द्यावर मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होती, त्यावर अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही देखील सरकारमधले घटकपक्ष आहोत. त्यामुळे आम्हाला ही निर्णय प्रक्रियेत स्थान हवंय’, अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. तसेच, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्याविषयी बाजू मांडणार असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देखील ‘महाराष्ट्रात काँग्रेस फक्त पाठिंबा देत असून निर्णय प्रक्रियेत काँग्रेस कमांडिग स्थितीत नाही’, अशी जाहीर भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीत भांड्याला भांडं लागू लागल्याचीच ही चिन्ह असल्याचं बोलले जात आहे.






















