महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी ऍण्ड बी (बेड ऍण्ड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आता 100 टक्के सुरू करता येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग, पर्यटकांचे स्कॅनिंग, सॅनिटायझेशन अशा उपाययोजना करून सर्व हॉटेल्स-रिसॉर्टस सुरू करता येणार आहेत. याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www. maharashtratourism.gov.in/ वेबसाइटवर देण्यात आली आहेत.
हॉटेल्स, रिसॉर्टस् यांनी प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा.
सेवा देताना तसेच वेटिंग रूम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर ठेवण्यात यावा. डिजिटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे.
हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱया पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱया वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करण्यात यावी.
पर्यटकांची ट्रव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाइन भरून घेण्यात यावा. शक्य असल्यास क्यूआर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इनसारख्या बाबी सुरू कराव्यात.
अभ्यागतांनी शक्य असल्यास त्यांच्या सामानाची स्वतः ने-आण करावी. एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास अभ्यागतांचा समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा.
रूम सर्व्हिस संपर्करहित असावी. अभ्यांगताने मागवलेली ऑर्डर रूमच्या बाहेर ठेवण्यात यावी. मुलांसाठीचे प्ले एरिया बंद राहतील. याशिवाय इतरही विविध मार्गदर्शक बाबींचा एसओपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.