महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाने जो २२ हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे . हा उपक्रम अतिशय स्तुत्य व चांगला आहे असे गौरवोद्गार बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी काढले .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ , इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ , इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील अगोती नं.१ येथे बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते ‘२२ हजार वृक्ष लागवड’ संकल्पाचा प्रारंभ सोमवार ( दि. १२ ऑक्टोबर ) रोजी करण्यात आला . यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने उपस्थित होते . यावेळी सुनंदाताई पवार बोलत होत्या .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे तसेच राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्या वतीने इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे , मुख्य सचिव सागर शिंदे , उपाध्यक्ष संदीप सुतार , जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी , तालुका संघटक भिमराव आरडे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले , सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी पत्रकार संघाचे रामदास पवार , दत्तात्रय गवळी , गोकुळ टांकसाळे , सचिन खुरंगे , उदय देशमुख , निखिल कणसे व प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले , स्वप्नील चव्हाण , त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष रामदास घनवट , सरपंच मोनाली दळवी , उपसरपंच सुनील शिंदे , ग्रामसेवक बालाजी निलेवाड , पोलीस पाटील रेश्मा गुणवरे , मुख्याध्यापक बालाजी कलवले , गावकरी ग्रामपंचायत सदस्य कौशल्य गुणवरे , सामजिक कार्यकर्ते विनोद दळवी , नंदकुमार भोसले , सुखदेव गुणवरे , दिलीप गुणवरे , अंगणवाडी शिक्षिका उषा सुतार , आशाताई शिंदे आदी उपस्थित होते . यावेळी अंगणवाडी शाळेमध्ये कोरोना मुक्ती संदर्भात गुढी उभारून महिलांनी उपस्थितांचे स्वागत केले .
पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की , गावोगावी वृक्षारोपण करून त्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कुटुंबासमवेत पत्रकार संघाने घेतली असून २२ हजार फळझाडे लावली जाणार आहेत . कोविड कालावधीत जी गरीब कुटुंबांना , नागरिकांना गरज होती . ती गरज ओळखून १३ हजार कुटुंबांना पत्रकार संघाच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप झाले आहे . त्यामुळे गोरगरिबांची सेवा या पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेली दिसते . मात्र वृक्षारोपण करताना , झाड कायमस्वरूपी जगले पाहिजे ते व्यवस्थित वाढले पाहिजे , यासाठी प्लांटेशन व ज्या कुटुंबांना ही झाडे दिली जातील . त्या कुटुंबांना प्लांटेशन संदर्भातील गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत . मगच दिलेल्या झाडांना फळे यायला वेळ लागणार नाही .अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली .
राज्य सरकार व केंद्र सरकारने कित्येक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करून देखील गावे स्वच्छ ठेवा , हात स्वच्छ ठेवा , शौचालय स्वच्छ ठेवा , या संकल्पना लोकांसमोर आणल्या . परंतु कित्येक नागरिकांनी या संकल्पनेचा स्वीकार केला नाही. परंतु कोविड ने सर्वच जनतेला गुडघे टेकायला लावले तोंडाला फडके बांधायला लागली , सॅनिटायझर हाताला वापरायला लावले , हाताची स्वच्छता कशी करायची हे शिकवले त्यामुळे महामारीने लोकांना अक्कल शिकवली आहे , असे असले तरी कोरोना कधी जाणार हे कोणालाही स्पष्ट सांगता येत नाही . त्यामुळे कोरोनाला घेऊन जगायचे आहे . घरातला किचनचा कट्टा एक दिवस स्वच्छ करायचा राहिला तरी चालेल , मात्र आपले स्वच्छालय लखलखीत निर्मळ असले पाहिजे . घर स्वच्छ असेल तरच आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळेल . त्यामुळे मुलांना संस्कार शिकवा जे पेराल तेच उगवते त्यामुळे अगोती गावाने आगामी काळात स्वच्छतेसंदर्भात उत्कृष्ट काम करावे असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले तर सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले व आभार सिनेमा अभिनेते शिवकुमार गुणवरे यांनी मानले.
” नवदुर्गा चा जागर करताना स्वच्छतेचा जागर करा “
आपल्या घरात वर्षानुवर्ष वापरलेल्या गोधड्या व पडून असलेली भांडी,आपण ३६५ दिवस चकाचक ठेवली पाहिजे . उगीच नवरात्र उत्सवात धुणीभांडी धूत महिलांनी स्वतःला त्रास करू नये . ३६५ दिवस आपले घर आरशासारखे स्वच्छ ठेवा . निर्मळ ठेवा यंदा कोरोनामुळे मंदिर बंद आहे . मंदिराकडे न जाता या नवदुर्गाचा जागर करताना स्वच्छतेचा जागर महिलांनी करावा . जेथे गृहिणीचा हात फिरतो तेथे लक्ष्मीचा वास असतो . व जेथे घरासमोर कचरा असतो , घाण असते तेथे अवदसेचे राज्य असते . त्यामुळे स्वच्छतेचा जागर करा , असे आवाहन उपस्थित महिलांना सुनंदाताई पवार यांनी केले .
” इंदापूर तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी होस्टेल काढावीत “
सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून बारामती येथे अध्यावत मुलींना शिक्षणासाठी होस्टेल व शैक्षणिक सुविधा कित्येक वर्षापासून उपलब्ध आहेत . यामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व मुलींना प्राधान्याने प्रवेश दिला जातो . मात्र वाढती लोकसंख्या मुलींचा शिक्षणातील गुणात्मक दर्जा यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये अध्यावत मुलींच्या शिक्षणासाठी होस्टेल बारामतीच्या धर्तीवर काढले जावे . अशी अपेक्षा पुणे जिल्हा परिषदेचे माझी बांधकाम सभापती प्रवीण भैय्या माने यांनी व्यक्त केली .