कोरेगाव : कोरेगाव हा कृषी प्रधान तालुका असून, शेतीशी निगडीत पाणंद रस्त्यांचे प्रश्न मोठ्याप्रमाणावर आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला असून, ऊस वाहतुकीसाठी शेतरस्ते खुले करणे आवश्यक आहे. शेतकर्यांच्यादृष्टीने हा विषय महत्वपूर्ण असून, समन्वयाने तो सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती नूतन तहसीलदार अमोल कदम यांनी दिली.
कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांशी कदम यांनी नुकताच संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडलाधिकारी किशोर धुमाळ व तलाठी शंकरराव काटकर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष हणमंतराव बर्गे, मार्गदर्शक सदस्य प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष अविनाश कदम, सचिव साहिल शहा, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र तरडेकर व अधिक बर्गे यांनी अमोल कदम यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
कोरेगाव तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. दोन लोकसभा मतदारसंघ, तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तालुका विखुरला आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील साखर कारखाने कोरेगाव तालुक्यातून मोठ्याप्रमाणावर ऊस नेतात, परिणामी ऊस वाहतुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात पाणंद रस्ते, शेतरस्ते याविषयी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, कायदेशीर मार्गाने ते सोडविण्यास अनेक वर्षे लागू शकतात, मात्र समन्वयाने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन गावपातळीवर बैठका घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहितीही कदम यांनी दिली.
सामान्य जनतेला तालुक्याच्या मुख्यालयात येऊन महसुली कामकाज लवकरात लवकर करुन मिळावे, या उद्देशाने कामकाज पध्दतीमध्ये बदल केले जाणार आहेत. गतिमान व पारदर्शक कामकाज यासाठी आग्रही असून, अभिलेख कक्ष अर्थात रेकॉर्ड रुमचे कामकाज अधिक प्रभावीपणे कसे होईल, याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. एकात्मिक नागरी सुविधा केंद्रांसह महाईसेवा केंद्रांचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण कसे होईल, याबाबत सूचना दिल्या आहेत. निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यावर नियंत्रण ठेवत असल्याचे कदम यांनी निदर्शनास आणून दिले.
नुकसान भरपाईचा अहवाल तात्काळ
कोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. प्रांताधिकारी सौ. ज्योती पाटील यांच्यासमवेत प्रत्येक महसूल मंडलामध्ये जाऊन नुकसानीचे पंचनामे केले आहेत. कृषी विभागाबरोबरच ग्रामविकास विभागाबरोबर समन्वय ठेवून नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती संकलित केली जात असून, त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला जात असल्याची माहिती अमोल कदम यांनी दिली.
दक्षिण सोलापूर व गारगोटी येथे यशस्वी कामगिरी
मूळचे वाई तालुक्यातील केंजळचे रहिवासी असलेल्या अमोल कदम यांनी सातार्यातून शिक्षण पूर्ण केले आहे. राज्य सेवेत ते तहसीलदार म्हणून रुजू झाले. परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर दक्षिण सोलापूर व गारगोटी येथे तहसीलदार म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कामकाज पाहिले आहे. नुकतीच त्यांची कोरेगाव येथे बदली झाली आहे.