लोणंद प्रतिनिधी/
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण गुरूवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने चांदोबाचा लिंब येथे वारकऱ्यांच्या अलोट उत्साहात व टाळ मृदुंगाच्या गजरात पहीले ऊभे रिंगण पार पडले. त्यानंतर माउली…माउली…आणि ग्यानबा…तुकाराम…असा गगनभेदी जयघोष करीत वारकऱ्यांनी वारीतील पहिले उभे रिंगण पाहताना आध्यात्मिक मेजवानीचा आनंद लुटला. भक्ती, शिस्त आणि अनुशासनाचा मूर्तीमंत सोहळा या रिंगणावेळी अनुभवायला मिळाला.
माउलींचा पालखी सोहळा लोणंद येथे मंगळवारी सायंकाळपासून अडीच दिवसांसाठी विसावला होता. गुरुवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माउलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करताना सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषदचे सदस्य दत्ता अनपट यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर प्रथम पालखीचा मानाचा नगारखाना चांदोबाचा लिंब येथे आला परिसरात माउलींचा चांदीचा रथ पोहचल्यावर सर्व दिंड्या आहे, त्या जागी थांबविण्यात आल्या. सर्व दिंड्यातील वारकऱ्यांनी दोन्ही बाजूने उभे रहात रिंगणासाठी माउलींचा जयघोष सुरू केला. यावेळी याची देही याची डोळा रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता
चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळ्यापुढे असणारे दोन अश्व ज्यात एकावर स्वत: माउली स्वार असतात. तर दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा घोडा ज्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. चोपदारांनी दंड उंचावून इशारा दिल्यावर या दोन्ही अश्वांनी वेगाने दौड घेत रथापुढील दिंड्यां पर्यंत जावून पुन्हा ते माउलींच्या रथापर्यंत आले. यावेळी त्यांना नैवैद्य भरविण्यात आला त्यानंतर पुन्हा अश्वांनी एकमेकांशी स्पर्धा करीत वारीतील पहिले उभे रिगणं पूर्ण केले. अन् पहिले उभे रिंगण पार पडले.त्यानंतर अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी एकच गर्दी उसळली.

या वेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेराने येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू झाला होता. रिंगणाच्या जागेत सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रिंगण सोहळा आटपून विविध खेळ खेळून पुन्हा अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी तरडगावच्या मुक्कामासाठी निघाले.






















