महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
कवठे (मसूर) ता.कराड येथील रत्नकर नावाच्या शिवारातील सुमारे 35 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून काहींच्या ठिबक सिंचन पाईप्स व पाण्याचे चेंबर्सही जळाले. घटनेची माहिती मिळताच शेकडो तरुण व शिवारात ऊस तोडणारे ऊसतोड कामगार घटनास्थळी दाखल झाले. कुणी पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक युवक व ऊसतोड कामगारांनी ऊस तोडून दोन्ही बाजूच्या क्षेत्रामध्ये अंतर करत आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळविले.
दरम्यान राजेश विठ्ठलराव साळुंखे यांच्या शेतातील व बाजूच्या शेतातील ऊस तोडून अंतर राखण्यात यश आल्याने सुदैवाने आजूबाजूचा आणखी सुमारे 25 एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचला.वर्षभर खतपाणी घालून रात्री-अपरात्री पाणी पाजुन मोठा केलेला ऊस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाचे सावट दिसून येत होते. तर काहींच्या डोळ्यांच्या कडा पानावलेल्या स्पष्ट जाणवत होत्या. शेतकऱ्याच्या नशिबी संघर्ष पाचवीलाच पुजलेला आहे.असे बोल अनेकांच्या तोंडून ऐकू येत होते.
या घटनेत कवठे व नवीन कवठे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुभाष गणपती कुंभार ६२ गुंठे, तानाजी गणपती कुंभार ४० गुंठे, विलास अर्जुन केंजळे ४९ गुंठे, लक्ष्मी मोहन साळूंखे ३५ गुंठे, साहेबराव लक्ष्मण जाधव २० गुंठे, पांडुरंग संपत यादव ३४ गुंठे, दादासो पिलोबा साळुंखे ३० गुंठे, आबाजी अशोक धस १८ गुंठे, सतीश किसन साळुंखे २१ गुंठे, सुभाष किसन साळुंखे २१ गुंठे, अंकुश बापू साळुंखे १० गुंठे, कुसुम नामदेव साळुंखे १० गुंठे, किरण मोहन नलवडे ३० गुंठे, इंदुबाई दिनकर शिंदे १७ गुंठे, शकुंतला नामदेव साळुंखे १७ गुंठे, सुरेश यशवंत साळुंखे ९ गुंठे, अरुण यशवंत साळुंखे ९ गुंठे, कमल विष्णू यादव २२ गुंठे, मनोहर खाशाबा यादव २२ गुंठे, दादा खाशाबा यादव २२ गुंठे, रमेश किसन यादव २२ गुंठे, जगन्नाथ दिनकर साळुंखे २७ गुंठे, लक्ष्मण आनंदराव साळुंखे २७ गुंठे, उत्तम बाबुराव माने १ हे.२० गुंठे, माणिक बाबुराव माने ९ गुंठे, विजयराव शंकरराव पाटणकर २९ गुंठे, आकाराम सर्जेराव सूर्यवंशी, तुकाराम सर्जेराव सुर्यवंशी २९ गुंठे, गोरख एकनाथ साळुंखे ३५ गुंठे, वसंत आनंदराव साळुंखे ४० गुंठे, राजेश विठ्ठलराव साळुंखे ४२ गुंठे आदी शेतकऱ्यांचा मिळून सुमारे 35 एकर ऊस जळून खाक झाला आहे.
घटनेची खबर मसूर पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली असून गाव कामगार तलाठी सौ.दंडवते यांनी पंचनामा केला आहे.