पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कामगार आंदोलनावरून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप केले जात आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे राजकारणात असल्याने मुद्दामहून चिखलफेक केली जात आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एन.सी.एल.टी.) च्या निर्णयानुसार सदरचा व्यवहार झालेला आहे. कायद्यानुसार कामगारांनी त्यांच्या थकीत पैशांसाठी मालकाकडे जावे आणि सूड बुद्धीने सुरु असलेली चिखलफेक थांबवावी. यापुढे याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही, असे साई ऍग्रो प्रोडक्टस कंपनीचे मॅनेजर जीवन पिसाळ यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, सातारा एमआयडीडीतील पंडित ऑटोमोटिव्ह सातारा प्रा. लि. कंपनी बँक ऑफ बडोदाने ताब्यात घेतली होती. संबंधित वित्तीय संस्था, बँका यांच्या माध्यमातून एनसीएलटीमध्ये संबंधित प्रकरण गेले होते. एनसीएलटीच्या माध्यमातून या प्रॉपर्टीचा लिलाव काढला गेला. कायदेशीररित्या सर्व बाबी पार करत लिलावाचे रीतसर पैसे एनसीएलटीकडे भरले. त्यानंतर एमआयडीसीने ती जागा साई अॅग्रोटेकच्या नावावर केली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उताऱ्यावर कंपनीचे नाव लागले. वास्तविक एमआयडीसीतील बंद कंपन्यांची जागा गरजू, होतकरू व्यावसायिकांना मिळाली तर छोटेमोठे उद्योग एमएडीसीमध्ये सुरु होतील आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल. यासाठी अशा उद्योजकांना हक्काची जागा मिळाली पाहिजे याउद्देशाने साई ऍग्रो प्रोडक्टस कंपनीसह इतर २८ छोट्या मोठ्या उद्योजकांनी पंडित ऑटोचे दोन प्लॉट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केले आहेत.
संबंधित कामगारांच्या पगाराबाबत कायदेशीर गोष्टी तपासल्या तर त्याची जबाबदारी आमच्या कंपनीकडे येत नाही. कामगारांनी एनसीएलटी, बँक ऑफ बडोदा व पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीचे मालक यांच्याशी बोलणे किंवा कायदेशीर मार्ग बघितला पाहिजे. गेले ३० वर्षांपासून हे कामगार पंडित ऑटोकडे काम करत होते. मालक आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली कंपनी बंद पडली. पंडित ऑटोच्या मालकाने पुणे, सातारा, सांगली, बारामती आदी शहरात असलेल्या जागा अविनाश भोसले, देशमुख (सातारा) आदी मोठमोठ्या बिल्डरांना विकल्या. कामगार तेव्हा का गप्प होते? तेव्हा का पैसे मागितले नाहीत? दीड वर्षांपूर्वी आमच्या कंपनीने जागा खरेदी केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत कामगारांचा प्रश्न सुटण्यासाठी वेळ दिला होता. आमच्या कंपनीने कर्ज काढून जागा खरेदीचा व्यवहार केला आहे. आम्ही तरी किती दिवस थांबणार? त्यामुळे कामगारांनी कायदेशीर मार्गाने त्यांचे पैसे मालकाकडून घ्यावेत आणि अपप्रचार थांबवावा. यापुढे यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही, असेही पिसाळ यांनी म्हटले आहे.