खंडाळ : पुणे- सातारा हायवेवर प्रशांत पवार (वय 23, रा. अनवडी, ता. वाई) यांचा अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना उघडकीस आलेली असून आरोपींना खंडाळा पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेला असताना अपघाती मयताचा भाऊ ओंकार प्रकाश पवार व जखमी साक्षीदार मयताचे वडिल प्रकाश आबाजी पवार (दोन्ही रा. अनवडी, ता. वाई) यांनी गंभीर जखमी झाल्याबाबत खंडाळा पोलीस ठाणेत फिर्याद दिलेली होती. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पारगाव (ता. खंडाळा) येथे दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास गावचे हद्दीत पुणे ते सातारा हायवे रोडवर पिरबाबा दर्गाजवळ एका दुचाकी वाहनाचा अपघात होवून त्यामध्ये तीन वाहनस्वारांपैकी प्रशांत प्रकाश पवार (रा. अनवडी, ता. वाई, जि. सातारा) याचा मृत्यू झाल्याची फिर्यादी देण्यात आली होती. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा, जि. सातारा) येथील मृत युवक नात्याने पाहुणा लागत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या गुन्ह्याचा पोलीस तपासकरित असताना अपघातातील मयत प्रशांत प्रकाश पवार हा अपघातात मरण पावलेल्या नसून त्याला संशयित आरोपी हणमंत ऊर्फ प्रकाश संपत यादव ( वय 35), सचिन नामदेव यादव (वय – 43 ), अभिषेक ऊर्फ गौरव शिवाजी यादव (वय- 22), विजय गणपत यादव (वय- 39), कुणाल भानुदास यादव (वय 23, सर्व रा. पारगाव ता खंडाळा जि. सातारा) यांनी मौजे पारगाव (ता. खंडाळा) गावचे हद्दीतील रानातील एका शेडमध्ये नेवून लाकडी दांडके व फायबर काड्यांनी मारहाण केली. तसेच त्यानंतर मौजे पळशी (ता. खंडाळा) येथे मयत प्रशांत पवार व जखमी साक्षीदार यांना आरोपी आशा गोळे हिचे घरी घेवून जावून पुन्हा वरील पाच आरोपी व इतर आरोपी वैष्णवी बाळकृष्ण शिंदे (रा. पारगाव ता खंडाळा जि. सातारा), आशा ज्ञानदेव गोळे (रा. पळशी ता. खंडाळा), आशा फुलचंद मोरे (रा. वाण्याचीवाडी ता खंडाळा) यांनी लाकडी दांडके व फायबर काडयांनी आणि लाथा बुक्यांनी परत मारहाण केली.
त्याचप्रमाणे यातील फिर्यादी व जखमी साक्षीदार यांनाही वरील आरोपींनी मारहाण केलेली आहे. मयतास आरोपींनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावल्याचे लक्षात आलेनंतर आरोपींनी मयतास हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता नेले असता तो मयत झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना जीवे मारण्याची धमकी देवून अपघात झाल्याचा बनाव करुन त्यांना खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे खोटी तक्रार दिल्याप्रकरणी आरोपी क्र. १ ते ५ यांना अटक करण्यात आलेली आहे.
सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे व पोलीस पथकातील पोलीस अधिकारी शंकर पांगारे, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, सुरेश नोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, सचिन वीर हे पुढील तपास करीत आहेत.
































