कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडून देणाऱ्या गावास “एक पेटी वाचनालय”तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल, अशी योजना “संस्कृती कला मंच” या य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यशेंद्र क्षीरसागर यांनी जाहीर केली आहे . तसेच अशा बिनविरोध ग्रामपंचायतीच्या गावातील सर्व इच्छुक तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सोय केली जाईल.अशी देखील घोषणा या योजनेत करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुक्यातून प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे, अशी अपेक्षा देखील क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.गावामध्ये गट तसेच मतभेद असतील तर स्वयं पूर्ण तसेच सर्वस्पर्शी विकास होऊ शकत नाही .एक दिलाने आपले प्रतिनिधी निवडले तर संपूर्ण गाव एकत्र राहते आणि आदर्श गावाची निर्मिती होते.महाराष्ट्रात अनेक गावांनी तसा आदर्श घालून दिला आहे.अशा पद्धतीने बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर करीत आहोत असे श्री क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
आज गावासमोर अनेक आव्हाने असतात.या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व गावाने मतभेद विसरून एकत्र यावे.व्यसनाधीनता, गुन्हेगारी, बेरोजगारी, पाणीप्रश्न असे अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र येणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.तसा आदर्श ग्रामपंचायतींनी घालून द्यावा .
म्हणून ही योजना जाहीर करण्यात येत आहे असे पत्रकात म्हटले आहे.गावात वाचण्याची संस्कृती नांदावी आणि संस्कार रुजावे म्हणून सर्व प्रकारची पुस्तके तसेच सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते या गावाचा सत्कार करण्यात येईल.तसेच गावातील सर्व तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोफत विविध सत्रांमध्ये घेतले जाईल असा देखील योजनेत समावेश आहे.तरी गावांनी बिनविरोध निवडणुकीचा प्राधान्याने विचार करावा ,असे कळकळीचे आवाहन या पत्रकात श्री.क्षीरसागर यांनी केले आहे






















