शनिवारी मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही अशाच पुस्तक गणपती संकल्पनेसह यंदाच्या वर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पण, बाप्पासाठी कल्पकतेनं केलेली आरास त्यांना अडचणीत आणणारी ठरली. ज्यामुळं अखेर सोशल मीडियावर त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करत एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांची जाहीर माफी मागितली.
यंदाच्या वर्षी तरडे यांनी पुस्तक गणपती या संकल्पनेअंतर्गत बुद्धिदेवता गणरायाचा पुस्तकांची आरास करत त्यात विराजमान केलं होतं. सोशल मीडियावर त्यांनी याचा फोटोही पोस्ट केला. पण, असं करताच त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. पुस्तकांचा ढीग रचत तरडे यांनी ही आरास साकारली. पण, यामध्ये त्यांनी भारतीय संविधानावर पाट ठेवत त्यावर बाप्पांना विराजमान केलं. ही बाब अनेकांनाच खटकली.
तरडे यांची ही कृती खटकल्याची बाब निदर्शनास आणत त्याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्याकडून ज्यांच्या भाववा दुखावल्या गेल्या आहेत अशा सर्वांचीच जाहीर माफी मागितली.
‘माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धिची देवता, बुद्धीचं प्रतीक अशी आणून दिलं’, असं म्हणत आरपीआय, भीम आर्मी आणि लातूर, पुण्यातील काही संघटनांनी आपल्या ही चूक निदर्शनास आणून दिल्याचं तरडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपली चूक मान्य करत मूर्तीच्या बैठक व्यवस्थेत केलेला बदल सर्वांच्या लक्षात आणून दिला. आपण कायमच सामाजिक भावना जपण्यास प्राधान्य देत असून, यापुढं अशी चूक कधीच होणार नाही अशी हमी त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून घेत सर्वांचीच मनापासून माफी मागितली आहे.




































