मात्र आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार
पाटण प्रतिनिधी : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाटण कोरोना केअर सेंटरबाहेर ऑक्सिजनची सुविधा असतानाही ती वेळेवर न मिळाल्याने तब्बल तीन तास वृध्द महिलेला ऍम्ब्युलन्समध्ये ताटकळत थांबावे लागले. अखेर त्या महिलेला ढेबेवाडी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. या घटनेची तातडीने दखल घेत पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी पाटणचे कोरोना केअर सेंटरमध्ये जावून सायंकाळी 11 वाजपर्यंत स्वत: जातीने उभे राहून बंद पडलेले ऑक्सिजन उपकरण कार्यान्वीत केले. आरोग्य विभागाने वेळेत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न केल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गतवर्षी पाटण तालुक्यात कोरोनाने कहर केला होता. तालुक्यात ऑक्सिजनची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कराड व सातारा याठिकाणी पाठवावे लागत होते. मात्र तेथेही बेड व आक्सिजन उपलब्ध न मिळाल्याने तालुक्यातील जवळपास शेकडोच्यावर कोरोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. याची गंभीर दखल घेत यापुढे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांनी तातडीने पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला नवीन बेडसह 25 ऑक्सिजन सिलेंडर दिले. तसेच ही सर्व यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे काही रुग्णांचे प्राणही वाचले होते. मात्र थोड्याच दिवसात तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने या ऑक्सिजन उपकरणांकडे आरोग्य विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हे उपकरण बंदच राहिले.
यावर्षी पाटण तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पाटणच्या आरोग्य विभागाने कोरोना केटर सेंटरमधील ऑक्सिजन उपकरणे पूर्ववत कार्यान्वीत करणे अत्यावश्यक होते. मात्र आरोग्य विभागाचे याकडे सर्रासपणे दुर्लक्षच झाले. अखेर शुक्रवार दि. 16 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका ऑक्सिजन उपकरणामधून गळती सुरू झाल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता. याप्रसंगी एका कर्मचाऱ्याने हे उपकरण त्वरीत बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबतची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना कळताच त्यांनी तात्काळ महसूलचे तलाठी जयेश शिरोडे, सर्कल आनंदा सपकाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार यांना घेवून पाटणचे कोरोना केअर सेंटर गाठले. त्याठिकाणच्या उपकरणांची पाहणी करून प्लंबर कर्मचाऱ्यांना रात्रीत बोलावून घेतले आणि स्वत: जातीने लक्ष घालून रात्री उशिरापर्यंत थांबून ऑक्सिजन उपकरणे चालू करून घेतली. त्यामुळे यापुढे रुग्णांना कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनसाठी तालुक्याच्या बाहेर जावे लागणार नाही. खऱ्याअर्थाने कोरोना केअर सेंटरमधील ऑक्सिजन उपकरणे सुरू ठेवणे हे आरोग्य विभागाचे काम असताना याकडे पाटणच्या आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. ऑक्सिजनची सर्व सुविधा उपलब्ध असतानाही आरोग्य विभागाने याकडे का लक्ष दिले नाही? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागाने कोरोना केअर सेंटरमध्ये प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा आरोग्य विभागाने जातीने सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. सध्या पाटणच्या कोरोना केअर सेंटरमध्ये आरोग्याशी निगडीत साहित्य व स्टेशनरी देखील उपलब्ध नाही. ते साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.