फलटण प्रतिनिधी/ श्रीकृष्ण सातव
फलटण : फलटण तालुक्याच्या पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. श्रीमती परविन सिकंदर सय्यद, रा.हाडको कॉलनी, फलटण या प्राथमिक शाळा वाठार निंबाळकर, ता. फलटण येथून 31 जुलै 20 रोजी सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे 5 मे 21 रोजी निधन झाले. त्यानंतर 3 च दिवसांनी त्यांचे पती सिकंदर यांचेही निधन झाले. शेवट पर्यंत त्यांचा पेन्शन प्रस्ताव सादर न केल्याने त्यांना देय असलेल्या निवृत्तीवेतना पासूनही वंचित राहावे लागले. यासाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित लिपिक जबाबदार असल्याचे संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कर्मचारी निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्या पेन्शनचा प्रस्ताव मा. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती फलटण यांच्या सहीने सादर करणे बंधनकारक असतानाही त्यांचा पेन्शन प्रस्ताव वेळेवर सादर केला गेला नाही. श्रीमती सय्यद यांना वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात होती. कोरोना प्रादुर्भावाचा कालावधीत शासनाने देऊ केलेल्या तात्पुरती पेन्शन चालू करण्याचा अधिकाराचा सुद्धा या ठिकाणी वापर करण्यात आलेला नाही.
त्यामुळे फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेतर्फे या प्रकरणाची दखल घेऊन मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती व संबंधित लिपिक यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेने जिल्हाधिकारी सातारा, शिक्षणाधिकारी प्राथमिक सातारा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद सातारा, तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे आदींना या प्रकरणी पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केलेली होती.
याप्रकरणी सय्यद यांचा पेन्शन प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात काही रकमेची मागणी काढण्यात आल्या वरून काही रक्कम आईने (मयत श्रीमती परविन सिकंदर सय्यद) दिली असल्याचे यांच्या मुलाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्या वरून शिक्षण विभागातील संबंधित लिपिक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे बदली करण्यात आल्याचे समजते. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी संबंधित प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना यासंदर्भात सविस्तर खुलासा करणे बाबत लेखी पत्र दिले आले. सादर करण्यात आलेला पेन्शन प्रस्तावही परत आलेला आहे. संबंधित कर्मचारी मयत झाल्यानंतर करावयाच्या कार्यवाही प्रमाणे या प्रस्तावात दुरुस्ती करून तो पेन्शन प्रस्ताव सादर करावा असा शेरा मारत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तो पंचायत समिती फलटण यांच्याकडे नुकताच परत पाठवलेला आहे.
थोडक्यात सेवानिवृत्ती नंतर एक वर्ष उलटून गेल्यावरही संबंधित कर्मचाऱ्याला/ त्यांच्या कुटुंबियांना अद्याप सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही. मयत परविन सय्यद या प्राथमिक शिक्षिकेच्या कुटुंबियांनाही सेवानिवृत्त वेतनाचा आता लाभ होणार नाही. कारण त्यांच्या पतीचेही त्यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी निधन झालेले आहे. या प्रकरणावर फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खरात आणि सचिव रामभाऊ कदम यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित गटशिक्षणाधिकारी आणि लिपीक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांना खुलासा मागू शकतात, परंतु कारवाई ही जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीच करू शकतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे






















