सातारा, दिनांक 7: जिल्ह्यामध्ये 45 वयावरील व्यक्तींचे लसीकरण पूर्ण क्षमतेने चालू असून एकूण 45 वर्षे वयावरील नागरिकांच्या 50 टक्के नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. कोरोना विरुद्धच्या अनेक प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लसीकरण पूर्ण क्षमतेने चालू आहे. 45 वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करण्यात आले असून त्यानुसार पूर्ण क्षमतेने लसीकरण चालू आहे .
9 लाख 63 हजार 47 पैकी 4 लाख 73 हजार 985 एवढ्या नागरिकांनी लस घेतली आहे. असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. लसीकरणाचे जिल्हा, तालुका, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्वच पातळ्यांवर अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री विनय गौडा जीसी यांनी या पत्रकात देऊन पुढे म्हटले आहे की लसीकरणाचे हे काम विविध जिल्ह्यांचा विचार करता सातारा जिल्ह्यात प्रगतिपथावर आहे. हे लसीकरण केवळ एखादा शासकीय उपक्रम म्हणून न राहता मोहीम पातळीवर राबवले जात आहे. जिल्हा पातळीपासून ते गावपातळीपर्यंत च्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची एकजूट आणि पूर्ण कसोशीने प्रयत्न यामुळे हे यश मिळत आहे .स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पातळीवर तसेच तालुका पातळीवर सातत्याने विविध माध्यमांद्वारा आढावा घेत आहेत .
जिल्हा स्तरावरील अधिकारी तसेच गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक आरोग्य सेविका अशा सर्वच पातळ्यांवर विशिष्ट अभ्यास करून प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी, तहसीलदार ,गटशिक्षणाधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख अशा विविध पदांवर च्या अधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले असून त्यांचे कार्य प्रभावीपणे चालू आहे .अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी, आरोग्य सेवक असे सर्व घटक नियोजनाप्रमाणे लसीकरणाचे काम चोख बजावत आहेत. केवळ तांत्रिकदृष्ट्या कर्तव्य न बजावता लोकांमध्ये प्रबोधन करणे लसीकरणासाठी उद्युक्त करणे असे विशेष प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती देखील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गौडा यांनी दिली आहे. सातत्याने विविध अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेणे, नियोजनामध्ये योग्य तेव्हा योग्य ते बदल करणे, नागरिकांमध्ये प्रबोधन करणे असे विविध प्रयत्न केले जात आहेत असेदेखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सूक्ष्म नियोजन, सामूहिक प्रयत्न यांच्यामुळे यश: विनय गौडा जीसी
लसीकरण म्हणजे केवळ उपक्रम असे न समजता मोहीम पातळीवर आणि अत्यंत तळमळीने सर्वच घटक ही मोहीम राबवित आहेत. केवळ उपक्रम न समजता नागरिकांच्या प्रबोधनावर विशेष महत्त्व भर दिला जात आहे. वारंवार आढावा घेणे, सूक्ष्म नियोजन करणे, सर्व घटकांची साथ घेणे, गावपातळीवरचे घटक विश्वासात घेणे अशा प्रयत्नांमुळे आपण अल्पावधीत 50% लसीकरण पूर्ण करू शकलो. या यशामध्ये सातत्य टिकविण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल .आपण लवकरच शंभर टक्के यशस्वी होऊ असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केला .आरोग्य, ग्रामपंचायत महिला बालकल्याण, शिक्षण अशा सर्वच विभागांनी मनापासून कार्य चालविल्यामुळे हे यश मिळत आहे