रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं खुशखबर दिल्यानंतर आता राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवरात्रीच्या सुरुवातीलाच आणि दिवाळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारीकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्यात आली आहे.
दसरा-दिवाळीच्या तोंडावर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. त्याचा लाभ सुमारे 19 लाख अधिकारी आणि कर्मचारी यांना होणार आहे. सन 2019 मधील महागाई भत्त्याची पाच महिन्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश करण्यात येणार आहे.