पाचगणी : करहर पोलीस दूरक्षेत्र ठाणे अमंलदार डी.जी.शिंदे यांनी झालेल्या मिसिंग महिले बाबत मोबाईल नंबर प्राप्त करून सहकारी पोलीस यांचे मदतीने सायबर क्राईमचे सहकार्याने तब्बल चार वर्षानंतर त्या आधारे संबंधित महिला, इसम व मुलास रत्नागिरी जिल्ह्यात शोध घेऊन पोलीस स्टेशनला हजर करीत प्रकरण निकाली काढले आहे. तर करहर पोलिसांची या आठवड्यातील दुसरी शोध मोहीम यशस्वी राबवली असल्याने त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
अलीकडे अनेक वैवाहिक जीवनातील कुरबुरी पुढे येत आहेत. त्यातूनच असा घटना उदयास येत आहेत. पलायन करून बाहेर जाऊन संसार थाटले जात आहेत. याबाबतची विस्तृत माहिती अशी की विवाहित महिला माहेरी आपल्या सावत्र आई सोबत रहात होती. तिच्या सोबत तिचा चार वर्षीय मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी सकाळी साडेनऊच्या सुमारास मेढ्याला मुलाला सोबत घेऊन केस कापण्याच्या व आधारकार्ड चे काम असल्याचा बहाणा करून तिने ओळख झालेल्या इसमासोबत पलायन केले होते. परंतु याची खबर कोणालाच नव्हती. याबाबत बेपता झालेल्या विवाहित महिलेच्या बहिनीने करहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल नंबर प्राप्त करून सातारा गुन्हे अन्वेषण शाखा, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानव्हे खराडे, व मेढा सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली करहरचे ठाणे अंमलदार डि जी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल, उद्धव पिसाळ, सुनील रोकडे, तसेच आंबेघर तर्फ कुडाळचे पोलीस पाटील अनिल गुरव यांच्या सहकार्याने संबंधित ३१ वर्षीय महिला, सात वर्षिय मुलगा आणि इसम यांस रत्नागिरी येथे शोध घेत. त्यांचा समक्ष जवाब करहर पोलीस घेतला. यामध्ये सदर महिलेने स्वतः स्व इच्छेने घर सोडले आहे याबाबतचा कबुली जबाब दिला असल्याने सदर फिर्याद निकाली काढली आहे. याबद्दल करहर पोलिसांचे करहर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.