संतोष सुतार/ प्रतिनिधी
माण : डॉ. नानासो शिंदेंनी अपहरणाचा खोटा बनाव करून शेखर गोरे यांना कटकारस्थान करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर खोटी माहिती देवून खरी माहिती लपवल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने म्हसवड पोलिसांनी डॉ. नानासो शिंदे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सपोनि बाजीराव ढेकळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील पानवन येथे दि. २७/०२/२०२१ रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास पानवण ते ढाकणी रोडवर कुंभेरीची वगळी जवळील पुलावर डॉ. नानासो अण्णा शिंदे, संजय किसन शिंदे व संतोष किसन शिंदे यांनी आपसात संगनमत करून डॉ. नानासो शिंदे यांचे अपहरणाचा बनाव करून डॉ. शिदे यांनी स्वतःच्या चारचाकी क्र. एम.एच १४ डी.ए.४००४ च्या शिटवर डिझेल ओतून पेटवुन दुसयने पेटवली आहे, असा खोटा पुरावा तयार केला होता. तसेच त्यांनी घडलेल्या प्रकाराची पोलीसांना खरी माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना, ती देण्याची टाळाटाळ करून खोटी माहिती देवुन शेखर भगवान गोरे व त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने अपहरणाचा बनाव केला होता. असे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी डॉ. नानासो आण्णा शिंदे (वय ५७ वर्षे), संजय किसन शिंदे (वय ३६ वर्षे) व संतोष किसन शिंदे (वय ३५ वर्षे सर्व रा. पानवण, ता. माण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संशयीत आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पुढील तपास वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.व्ही डोईफोडे करीत आहेत.






















