पत्नी, भावजय, मेव्हणा गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, आरोपींना चार दिवसांची कोठडी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा : सैनिकाच्या खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींसमवेत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व तपास पथकातील कर्मचारी
सातारा तालुक्यातील सैदापूर गावात सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचा अज्ञातांनी मारहाण केल्याने उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची तक्रार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर केवळ चार तासात या घटनेचा छडा लावला असून सैनिक संदीप पवार याच्या त्रासास कंटाळून त्याच्या पत्नी, भावजय व मेव्हण्यानेच त्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड केले. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमनाथ भरत आंबवले (वय 29 रा. खोलवडी, ता. वाई), पत्नी चेतना संदीप पवार (वय 35) आणि सुषमा राहुल पवार (वय 38, दोघीही रा. सैदापूर, ता. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, संदीप जयसिंग पवार वय 39 रा. सैदापूर, ता. सातारा हा सुट्टीवर गावी आला होता. त्याला दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी जबर मारहाण करुन जखमी केल्याने त्याची पत्नी चेतना संदीप पवार व नातेवाईकांनी संदीप पवार यांना पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारास दाखल केल्यावर त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत पत्नी चेतना पवार हिने पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात पती संदीप पवार यांना मारहाण करुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञातांविरुध्द तक्रार दाखल केली होती.
याबाबत पुणे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतीय सैन्य दलातील जवानाचा अशा प्रकारे मारहाणीत मृत्यू झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना या घटनेचा सखोल तपास करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार रमेश गर्जे व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी सैदापूर येथे मृत सैनिक संदीप पवार याच्या घरातील लोकांकडे, नातेवाईक तसेच शेजाऱयांकडे चौकशी सुरु केली. मात्र, संदीप पवार यांच्या घरातील लोक माहिती लपवित असल्याचे व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसून आले.
पथकाने मग गोपनीय माहिती घेवून त्या अनुषंगाने घरातील लोक व नातेवाईकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात जेव्हा कसून चौकशी सुरु झाली तेव्हा मग सगळे बोलू लागले. त्यावेळी मयत संदीप पवार याचे खुनामध्ये त्याची पत्नी भावजय व मेव्हणा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सैनिक संदीप पवार यांना दारुचे व्यसन होते. ते सतत पत्नीला मारहाण करत होते तसेच घरच्या लोकांना त्रास देत असल्याने नातेवाईकांनी त्यांचा काटा काढल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सज्जन हंकारे करीत आहेत.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, पोलीस नाईक शरद बेबले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, विशाल पवार,गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, संजय जाधव यांनी सहभाग घेतला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.