फलटण : दि. 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने फलटण शहर पोलीस ठाण्यात तर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याचे महत्त्व फायदे, तोटे, सांगत असताना त्यांनी या कायद्यात असलेल्या तरतुदींची चर्चा केली. बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये गरजू नागरिकांनी त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
जगताप पुढे म्हणाले, ज्येष्ठांना कायद्यानुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. उपस्थितांच्या माध्यमातून इतर गरजू लोकांना याची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. न्यायालयामध्ये याबाबतच्या दाव्यासाठी कालावधी खर्च होतो, पैसा खर्च होतो आणि दगदग होते. ती टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी शासनाने प्राधिकृत केलेल्या आमच्या कार्यालयातर्फे केल्या जाणाऱ्या मदतीचे, सहकार्याचा फायदा घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अरविंद मेहता म्हणाले, शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी अडचणी, वेगळ्या असतात. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, तक्रारी या वेगळ्या आहेत. त्याचा वेगळेपणाने निपटारा, विचार करण्यासाठी नव्याने पुन्हा संघटनेमार्फत, स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रयत्न होणे गरजेचे आहे, विद्यमान ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना या शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, तक्रारी पुरत्या मर्यादित राहिल्याचे जाणवते.
त्यामुळे निदान फलटण तालुकास्तरावरती अशा प्रकारच्या नव्या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्याची संकल्पना सर्व उपस्थितांना मान्य झाल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी माझी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांनी चालू केलेल्या शांती जनसेवा संघटनेमार्फत सर्वांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती देत, त्याचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व इतर गरजू व्यक्तीने ही लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, पोलीस निरीक्षक भारत केंद्रे यांच्यासह फलटण व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी फलटण शहर पोलीस ठाण्यात सकाळी दहा वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या सभेचे आयोजन केले जाते