दोघांना अटक : एक फरार
पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव या दोन ठिकाणी शुक्रवारी दि.८ रोजी वाठार पोलीस, अन्न सुरक्षा अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार झाला आहे.
याबाबत वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, पिंपोडे बुद्रुक, ता.कोरेगाव येथील जितेंद्र नारायण पवार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. तर त्याच्या आश्विन नारायण पवार या भावाचा अंडी विक्रीचा होलसेल व्यावसाय आहे. गेली अनेक वर्षे अश्विन हा गुटखा अवैध विक्री करीत आहे. त्याच्यावर व त्याच्या पत्नीवर यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन्ही भावांकडे मिळून दोन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल मिळून आला आहे.
पिंपोडे खुर्द, ता.कोरेगाव येथील संतोष भरत कदम याच्याकडे चौऱ्यानऊ हजारांचा अवैध गुटखा माल मिळून आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत कोरेगावचे पोलीस उप अधीक्षक गणेश किंद्रे, वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बनकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू धुमाळ, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल ढोपरे, झारी, शिंदे यांच्यासह सातारा येथील अन्न सुरक्षा अधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
जितेंद्र नारायण पवार, संतोष भरत कदम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अश्विन नारायण पवार हा फरार झाला आहे. संतोष कदम याची नऊ लाख रुपये किंमतीची एक चार चाकी गाडी ही यावेळी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास वाठार पोलीस स्टेशनचे स.पो.नि. संजय बोंबले आणि पो.उ.नि संदीप बनकर हे करीत आहेत.




















