महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :कराड येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा आदरणीय पी. डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२, आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, भारती विद्यापीठ अभिमतविश्वविद्यालयाचे कुलपती, प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणाप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, विश्वस्त अशोक पांडुरंग पाटील, अॅड मानसिंगराव
पाटील, राजेंद्र वसंतराव माने, दिलीपभाऊ चव्हाण, डॉ. विजयकुमार साळुंखे, सौ. रेश्मा कोरे, सौ. शोभा
पाटील, संयोजन समिती सदस्य प्रा. एस. ए. डांगे, प्रा. रामभाऊ कणसे, मुकुंदराव कुलकर्णी, ए.एन. मुल्ला,संभाजी पाटील, प्रा. एस. व्ही. जोशी, अबुबकर सुवार, प्रकाश पवार व सुहेल बारस्कर यांची उपस्थिती होती.कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रतिष्ठानने २०११ पासून महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेल्या विभूर्तिना, ‘आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्याची ठरविले आणि १ जुलै २०११ ला पहिला पुरस्कार थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रुपये ५१०००/-, मानपत्र व स्मृतिचिन्ह असून, आजअखेर कु. नसीमा हुरजूक, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. अभय बंग, डॉ. जब्बार पटेल व डॉ. रणजित जगताप यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत २ वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. आता, यावर्षी २०२२ चा पुरस्कार प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर करण्यात आला असून, आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांच्या ‘स्मृतिदिनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले.
ReplyForward |