सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा निकाल काहीसा अनपेक्षित आणि काहीसा अपेक्षित असाच लागला .अनपेक्षित या अर्थाने राज्याचे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ,पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव हा शेवटच्या क्षणापर्यंत विजयात परावर्तीत करण्यात ही मंडळी यश मिळवतील असे वाटत होते ते झाले नाही.त्याचबरोबर ज्यांच्या लढती राज्यात गाजवतील असे वाटत होते ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची संचालक म्हणून निवड होणे हे एका अर्थाने अनपेक्षित होते . मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पुन्हा एकदा नातेसंबंध, पै पाहुणे ,प्रस्थापित यांच्या ताब्यात राहणार हे अपेक्षित होते . आणि झालेही तसेच .खरंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हेतू मध्यम मुदतीची कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा असतो .शेतकऱ्यांच्या हिताचे आर्थिक निर्णय आणि त्यांना मदत यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाल्या .त्यातूनही कोणेएके काळी सावकारांच्या क्रूर कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुक्त करावे यासाठी या बँकांची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संस्था सहकारी पतसंस्था सहकारी बँका यांची निर्मिती झाली .
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे .देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीशी संबंधित आहे .अशा परिस्थितीत शेतीकडे आणि शेतकऱ्यांकडे या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे तेवढे दिले जात नाही .शेतकऱ्यांची आणि शेतीची अवस्था त्या अर्थाने दयनीय आहे .शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था होण्यामध्ये शेतकऱ्यांचाच वाटा मोठ्या प्रमाणात आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते .याचे कारण शिक्षणाचे आणि माहितीचे अत्यंत कमी प्रमाण शेतकऱ्यांकडे असते .योग्य पद्धतीने सहज, सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना अर्थव्यवस्था ,कृषी क्षेत्राची माहिती दिली जाणे आणि ती मिळवण्याचा ज्या ताकतीने शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे तो प्रयत्न होत नाही . शेतकरी अजूनही परावलंबी आणि त्रासाच्या चक्रव्युवहातच अडकलेला आहे .या सगळ्यावर मात करण्यासाठी शेतकर्यांनी स्वतः बरोबर स्वतःच्या समूहाचा आर्थिक विकास करावा यासाठी सहकारी तत्वाचा वापर आपल्या देशात केला जातो .
राजकारण ताब्यात ठेवण्यासाठी
राजकारण आणि सहकार यामध्ये फरक ठेवला पाहिजे .राजकारण करणारी मंडळी सहकारात येऊ नये .यासंदर्भात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी स्पष्ट मत मांडले होते. मात्र आज या मताचा पाठपुरावा त्याचे अनुकरण करताना कोणी दिसत नाही .किंबहुना सहकाराच्या माध्यमातून राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून सहकार हे चक्र फिरताना दिसते .सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके या चक्राला अपवाद नाही. बँकेचे संचालक आमदार ,खासदार, माजी आमदार ,होऊ घातलेल्या आमदार याशिवाय कोणी नाही .सहाजिकच अर्थकारणाच्या या महत्त्वाच्या संस्थेत राजकारण घडणारच नाही आणि केवळ आर्थिक मूल्यांवर सहकाराच्या तत्त्वावर बँकेचे संचालक मंडळ निवडून येईल असे मानणे म्हणजे आपल्या भाबडेपणाचे लक्षण आहे हे मान्य केले पाहिजे .विधान परिषदेचे सभापती असणारे श्री .रामराजे नाईक निंबाळकर ,गृहराज्यमंत्री असणारे शंभूराज देसाई ,सहकार मंत्री तथा पालक मंत्री असणारे बाळासाहेब पाटील ,राष्ट्रवादीचे बिनीचे नेते आमदार शशिकांत शिंदे या राज्याच्या ताकतवान मंडळींना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा एवढा मोह का असावा हा प्रश्न आहे .त्याचे उत्तर जिल्ह्याच्या राजकारणावर आणि आपल्या तालुक्यावर पकड ठेवायची असेल तर अर्थकारण, कृषी आणि सहकार या त्रिवेणी संगमा चे तीर्थक्षेत्र आपल्या अंगणात असले तर आपले राजकारण सोपे होईल हा विश्वास राजकीय मंडळींना आहे. आणि सहाजिकच आपले राजकारण सुखकर करायचे असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँके पासून सुरवात करणे आवश्यक असते. आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी अशा संस्था ताब्यात ठेवणे गरजेचे असते. सहाजिकच राज्य पातळीवर काम करणाऱ्या मोठ्या नेत्यांनाही जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मोह त्यामुळे सुटत नाही.
ना.देसाई,आ.शिंदे यांना धक्का
बँकेच्या लागलेल्या निकालावरून काही निष्कर्ष किंवा मुद्दे नक्कीच मांडता येतील. आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी अग्रक्रमावर होते. त्याला आता खिळ बसली आहे. आमदार शिंदे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते .ते कोरेगाव तालुक्यातून विधानसभा निवडणूक लढले होते. पूर्वी त्यांचा मतदारसंघ जावळी हा होता .आज जावळी या जिल्हा बँकेच्या मतदार संघातून त्यांचा एका मताने पराभव झाला .अर्थात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मात्र पूर्वीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्री.ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. श्री. रांजणे तसेच त्यांच्या पाठीशी उभे असणारे श्री.वसंत मानकुमरे यांनी आपल्याकडे अठ्ठावीस मते असल्याचा दावा केला होता .परंतु मतदानातून रांजणे यांची तीन मते आमदार शिंदे यांना मिळवल्याचे दिसत आहेत. सहाजिकच आमदार शिंदे यांनी विरोधकांची तीन मते मिळवण्यात यश मिळवले आहे. अर्थात आणिक एक किंवा दोन मते मिळाली असती तर पक्षाध्यक्ष श्री. शरद पवार यांना सातारा येथे बँकेच्या निवडणुकीसंदर्भात त्याच दिवशी बैठक घ्यावी लागली नसती .आमदार शशिकांत शिंदे यांना आता नव्या ताकतीने कोरेगाव मतदार संघात उभे रहावे लागणार आहे .आमदार महेश शिंदे यांचा पाठिंबा असलेले श्री. खत्री हे चिठ्ठी टाकून निवड झालेल्या उमेदवारात विजयी झाले आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्या नशिबाने तिथेही त्यांना साथ दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार चिट्ठी न निघाल्याने पराभूत झाला .आता आमदार शिंदे यांच्या वर्चस्वाला जावळी आणि कोरेगाव या दोन्ही ठिकाणी हादरा बसला आहे. यातून सावरणे आणि कार्यकर्त्यांची मोट बांधणे यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहेत .
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना आपल्या पराभवाची चाहूल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लागली असावी. याचे कारण त्यांनी राज्यात आघाडीचा धर्म असताना राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांनी अर्ज मागे घेतला पाहिजे किंवा पाहिजे होता हे त्यांना अपेक्षित होते .मात्र पाटणकर देसाई यांच्यात परंपरागत सुरू असणारा संघर्ष इथेही कायम राहिला .या बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.पाटण नगरपंचायतीच्या निवडणूका येऊ घातले आहेत .या निवडणुकीचे परिणाम आता पाटणच्या नगरपंचायत निवडणुकीत स्पष्टपणे दिसतील.
महत्वाचे मुद्दे
याशिवा याशिवाय राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना डॉ.अतुल भोसले यांनी मदत केली नसती तर राष्ट्रवादीचे नाक कापले गेले असते. स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांनी प्रारंभी जे वातावरण तयार केले होते ,ते नामदार पाटील आणि डॉ.भोसले यांच्या भेटी पर्यंत श्री.पाटील यांच्या बाजूने झुकलेले होते .मात्र डॉ.अतुल भोसले यांनी केलेल्या मदतीमुळे नामदार पाटील विजयी झाले. याशिवाय शेखर गोरे, प्रभाकर घाडगे यांनाही बँकेत प्रवेश मिळाला आहे .शेखर गोरे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात खरेतर हा संघर्ष होता. या संघर्षात गोरे यांना नशिबाने कौल दिला आणि चिठ्ठीवर झालेल्या निवडीत शेखर गोरे विजयी झाले. 14 आणि 19 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत तसेच यामध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेखर गोरे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. जिल्हा बँकेत प्रवेशामुळे अखेरीस त्यांना संचालका पदाच्या जागेवर विजय मिळवता आला .निवडणूक महत्त्वाची आणि अटीतटीची झाली .मात्र ज्यांच्या निवडीसाठी मोठा संघर्ष होईल असे वाटले होते त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या हे या निवडणुकीतील एक वैशिष्ट्य. त्याचबरोबर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. सभासदांना अज्ञातस्थळी लपवून ठेवावे लागले. दादागिरी, दहशतीचे आरोप झाले. बिनविरोध निवडून आले ते थेट निकालाच्या दिवशी हजर झाले. अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही निवडणूक लक्षात राहील. अखेरीस एकच सांगणे ज्या शेतकऱ्यांच्या साठी सभासदांनी 21 सदस्य निवडून दिले त्यांनी शेतकरी, सहकारी संस्थांचे सभासद, लहान लहान सहकारी संस्था यांच्यासाठी मन लावून काम करावे.राजकारणाचे जोडे बँके बाहेर काढून ठेवावे.