हल्लेखोर फरार : जखमीवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु
कराड : मलकापूर, ता. कराड येथील मलकापूर फाट्यावर भरदिवसा युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार केला. बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विश्वजित हणमंत येडगे (वय 23) रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कराड असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गाच्या पूर्वेकडील सेवा रस्त्यावर (मलकापूर फाटा) विश्वजित येडगे याच्यावर सुमारे चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रांने वार केला. या हल्ल्यामध्ये येडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची अधिक माहिती घेतली. तसेच पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा जबाब नोंदवला असून हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाच्या जीवितास कोणताही धोका नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
वादावादीचे रुपांतर हल्ल्यात
विश्वजित येडगे आणि हल्लेखोर यांच्यात मंगळवारी रात्री काही कारणांवरून वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून हा हल्ला झाला असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु होती.
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त
मलकापूर फाटा येथे पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पूर्वेकडील सेवा रस्त्यावर विश्वजित येडगे याच्यावर सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सुमारे चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रांनी वार केला. त्यांनतर हल्ल्यात जखमी झालेल्या येडगे याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती समजताच घटनास्थळी लोकांची गर्दी व सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.