पाटण : कराड-चिपळूण मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी उलटून 2 वर्षे होऊनही हे काम पूर्णतः अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. याबाबत जबाबदार शासकीय, कंपनीचे अधिकारी यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. संबधीत कंपनीवर कारवाई करून कंपनीने घेतलेले अतिरिक्त बील परत घ्यावे व कंपनीला काळ्या यादीत टाकावे, या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.विकास पवार यांनी दिला.
मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली येथील पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवार दि. 15 पासून सुरू झालेल्या आमरण उपोषण स्थळी जिल्हाध्यक्ष पवार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
ॲड.विकास पवार म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्र. इ. 166 (कराड-चिपळूण) या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी उलटून 2 वर्षे झाली आहेत. कंपनीने हे काम अर्धवट स्थितीत सोडून आता पूर्णतः बंद केले आहे. यासाठी जबाबदार असणारे शासकीय तसेच कंपनीचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे.
कराड ते संगमनगर (धक्का) या रस्त्याचे काम गेली 4 ते 5 वर्षे सुरू आहे. हे काम 48.417 किलोमीटर लांबीचे असून यासाठी सुमारे 281 कोटी रुपये मंजूर आहेत. 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र अद्यापही काम अर्धवट स्थितीतच आहे. यासाठी कंपनीचे अधिकारी कोरोना, शेतकरी अडथळा निर्माण करत असल्याची तकलादू कारणे सांगत होते. मल्हारपेठ, नवारस्ता, अडूळ परिसरातील अनेक मोऱ्या, पाटण शहरातील केरा नदीवरील पूल ही कामेही झालेली नाहीत. पाटण ते कोयनानगर रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या आहेत. अनेक अपघातप्रवण ठिकाणी लोखंडी रेलिंग लावली गेली नाहीत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मार्गदर्शक असणारे रिफ्लेकटर, रस्त्यावर दिलेल्या रंगांच्या पट्ट्याही सुमार दर्जाच्या आहेत. रस्त्याला आत्ताच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. कोट्यवधी रुपयांचे बील अदा होऊनही एल. अँड टी. कंपनीने काम अर्धवट सोडून पळ काढला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कंपनीने सुमारे 211 कोटी रुपये घेऊनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. रस्त्यावरील बसथांबे निवाऱ्यासाठी आहेत की, शो साठी हा संशोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी मधेच काम अपूर्ण असल्याने अपघाताचे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यामुळे संबंधित शासकीय तसेच कंपनीचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनसेचे राजू केंजळे, मीनाक्षी पोळ, चंद्रकांत बामणे, सागर बर्गे, विजय वाणी, दयाभाऊ नलवडे, संजय सत्रे, राहुल संकपाळ, नंदा चोरगे, जोत्स्ना कांबळे, अंकुश कापसे, हणमंत पवार, दीपक मुळगावकर, संभाजी चव्हाण, समर्थ चव्हाण, अधिक पाटील यांची उपस्थिती होती.
















गांधी शिल्प बाजार"" width="90" height="60">
गांधी शिल्प बाजार"" width="180" height="120">


