वनविभागाची कारवाई : पाच दुकानदारांकडून 1 हजार 735 ब्रश हस्तगत
कराड : शहरात विविध रंग व्यवसायिक दुकानदारांवर वन विभागाने धाड टाकून मुंगूस या वन्य प्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त केले. बुधवार दि. १५ रोजी वनविभागाने ही धडक कारवाई केली. यामध्ये कराड व मलकापूर येथील ५ दुकानदारांकडून मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले 1 हजार 735 ब्रश जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी, बुधवार दि. १५ रोजी वनविभाग कराड व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई राबवत कराड आणि मलकापूर येथे एकाचवेळी ५ रंग व्यवसायिक दुकानदारांवर छापा टाकला. यामध्ये सर्व दुकानात मुंगूस या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण असलेल्या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले. या पाचही दुकानातून वनविभागाने 1 हजार 735 ब्रश जप्त केले आहेत.
शिवानी पेंट्स – राजेंद्र विठ्ठल सुपणेकर (वय 37) रा. मलकापूर, ता. कराड (92 ब्रश), देवकर पेंट्स – संदीप किसनराव देवकर (वय 45) रा. शनिवार पेठ, कराड (४४७ ब्रश), सनशाईन पेंट्स – मलकापूर, तोहीम नजीर शेख (वय 39) रा. वाघेरी (212 ब्रश), भारत पेंट्स – नविद गुल्महुसेन वाईकर (वय 24) मलकापूर (163 ब्रश) व सह्याद्री पेंट्स – अखतर सिराज वाईकर (वय 51) रा. कराड (821ब्रश) अशी कारवाई करण्यात आलेल्या दुकाने व दुकानदारांची नावे आहेत. तर या कारवाईत त्यांच्याकडून एकूण 1 हजार 735 ब्रश जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
ही कारवाई महादेव मोहिते, उपवनसंरक्षक सातारा यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुबंई येथून आलेले कोन्स्टेबल विजय नांदेश्वर व संदीप येवले, वनविभाग कराड येथील वनपाल ए.पी. सावखंडे, डी.डी. जाधव, बी.बी. कदम, वनरक्षक रमेश जाधवर, दत्ता जाधव, अरुण सोळंखी, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, सुभाष गुरव, सविता कुट्टे, दीपाली अवघडे, पूजा परुले, पूजा खंडागळे, शितल पाटील, संतोष यादव, अरविंद जाधव हे सहभागी होते.































