महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ११ जानेवारी : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभामध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या एकूण कामकाजाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व आरोप केलेले होते. त्या सर्व तक्रारी व आरोपांच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या चौकशी समितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांनी ‘दै.महाराष्ट्र न्यूज’ शी बोलताना दिली.
याबाबत अधिक माहिती देताना घुले म्हणाले, या चौकशी समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून ज्या-ज्या तक्रारदारांनी कोळेकर यांच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या होत्या, त्या सर्व तक्रारदारांना चौकशी समितीच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला असून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे लेखी म्हणणे आणि त्याबाबतचे सर्व पुरावे चौकशी समितीकडे सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने तक्रारदारांनी दै.महाराष्ट्र न्यूज शी बोलताना शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याविषयी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली त्याच जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाकडे होण्यामागचे गौडबंगाल नेमके काय ? वास्तविक पाहता कोणत्याही विभागाच्या प्रमुखाची बदली ही त्याच जिल्ह्यात शक्यतो होत नाही. मग शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची बदली सातारा जिल्ह्यातच कशी झाली? या बदलीमागे मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले असल्याची चर्च्या संपूर्ण जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात सुरु आहे. त्यांनी बदलीसाठी केलेल्या मोठ्या प्रमाणावरील अर्थकारणामुळे संपूर्ण राज्यातील उपशिक्षणाधिकारी दर्जाचे अधिकारी त्यांच्या या कृतीवर तीव्र नाराज असून आम्हाला बढती घेण्याच्या वेळी एवढा पैसा आणायचा कोठून ? या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. तसेच सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला एजंटगिरीचा विळखा पडला असून वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात माध्यमिक शिक्षण विभागातील कोणत्याही स्वरूपाचे काम करून घेण्यासाठी एक-दोन एजंटांची नेमणूक केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील जिल्ह्यातील जे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इ. आर्थिक तडजोड करतात, त्यांच्याच कामाच्या फाईल वर काढल्या जातात आणि इतरांच्या फाईल मात्र महिनो महिने तशाच दाबून ठेवल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला न्याय मिळतच नाही, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे चित्र माध्यमिक शिक्षण विभागात दिसून येत
आहे. यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाच्या या तुकलघी कारभाराविरुद्ध जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून तीव्र नाराजीचा सूर असून या गंभीर विषयाची दाखल सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ पातळीवरून घेऊन हा सर्व प्रकार थांबविण्याची मागणी जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींनी केली आहे.