महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ११ जानेवारी : वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कडक निर्बंधांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेमधील विविध विभागातील कामासाठी जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करताना सॅनिटायझर, तापमानाची नोंद आणि लसीचे दोन डोस घेतलेल्याचे प्रमाणपत्र शिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच सरकारी कार्यालय मध्ये कार्यालय प्रमुखांच्या स्पष्ट आणि लेखी परवानगीशिवाय जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी एका परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या चार-पाच दिवसांमध्ये कोरोनाने जिल्हा परिषदेमध्ये शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कक्ष अधिकारी तसेच सहाय्यक कनिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आली आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागात कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकावर गर्दीचे नियंत्रण राखणे आवश्यक आहे. सरकारी कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुखांच्या स्पष्ट आणि लेखी परवानगीशिवाय नागरिकांना कार्यालयात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सदरच्या उपाययोजनांचे अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य इमारत व विस्तारित इमारतीमध्ये पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना प्रवेश करणे व बाहेर जाण्यासाठी मुख्य इमारतीच्या एकच दरवाजा चालू ठेवून इतर पर्यायी मार्ग पूर्ण बंद करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व शासकीय कर्मचारी यांचे वाहना व्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. तसेच संबंधितांचे ओळखपत्र पडताळणी करूनच प्रवेश देण्यात येत असून जिल्हा परिषद मुख्य दरवाजामधून प्रवेश करताना ओळखपत्र असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येत नसून वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.