शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी ,शेतीतील खरीप पिकांचे मोठे नुकसान
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड :
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कराड शहरात व तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ठिकाणी ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. रविवारी सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही दिवसापासून सकाळी कडक उन्हाचा तडाखा बसत आहे, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण होत आहे. रविवारी सकाळी कडक उन्हाचा तडाखा बसत असताना, दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावत बहुतांशी गावांना झोडपून काढले.दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. रस्त्याकडेला असणारी गटारे तुडुंब भरून वाहत होती. गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत होते रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे पाण्याने भरल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याची तळी निर्माण झाले होते.

या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील काढून टाकलेल्या व काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीन, ज्वारी, मका, दारकु, भात, चवळी ही पिक भिजून गेले आहेत तर शेतात उभे असलेल्या हायब्रीडचि कणसे भिजल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, करडई, हरभरा पिकांना हा पाऊस उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.






















