आपत्तीग्रस्त गावांना खबरदारीचे आवाहन – प्रांत सुनील गाढे
पाटण :- पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांसह अतिवृष्टी , महापूर अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणाऱ्या गावांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत . खबरदारी व उपाययोजनांसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाटणचे उप विभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली. गतवर्षी तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथे झालेल्या भूस्खलनामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्याची पाहणी महसूल, कृषी, बांधकाम आदी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह व स्थानिकांच्या समवेत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, आदी संबंधित विभागांचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेघर तर्फ मरळी ( वरचे ) या ठिकाणी भेट देऊन गतवर्षी भुसख्खलन झालेल्या भागाची पाहणी केली, नागरिकांशी चर्चा करून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्यावरील भागात जो मोठा दगड उघडा पडला आहे त्या ठिकाणावरून ये जा करताना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हा दगड काढणे आव्हानात्मक काम असून तो अशा ठिकाणी आहे की त्या ठिकाणी जे सी बी किंवा पोकलॅन जाणे शक्य नाही तरी देखील याबाबत यांत्रिकी विभाग व स्थानिक बांधकाम विभागास प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना हुंबरने, काहीर, मरळी वरचे या भागातील ग्रामस्थांनी काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल्याचेही सुनील गाढे यांनी सांगितले.