मुंबई : हंगामा प्ले, ह्या अग्रगण्य व्हिडीओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मने हंगामा ओरिजनल डॅमेज्डचा तिसरा सीझन लॉन्च केला. पहिल्या दोन सीझनप्रमाणे, डॅमेज्ड ३ हे मानसशास्त्रीय गुन्हे नाट्य असून या कथानकाला कणखर महिला व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत लाभली आहे.
या सीझनच्या नवीन कथेत मुख्य भूमिकेत आमना शरीफ आणि श्रेनू पारीख झळकणार आहेत. डॅमेज्ड ३ मध्ये पुलकीत बंगिया, यश भाटीया, विभूति उपाध्याय आणि अमन वर्मा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . या कार्यक्रमाचे दिग्दर्शन एकांत बाबानी यांनी केले असून निर्मिती एंडेमोल शाईन इंडियाची आहे. हा शो हंगामा प्ले आणि पार्टनर नेटवर्कवर स्ट्रीम होणार आहे.

या सीझनमध्ये रश्मी (आमना शरीफ) हि हेकेखोर पोलिसाचे पात्र साकारत आहे, ती आपल्या धडाडीच्या स्वभावाकरिता प्रसिद्ध आहे. पोलिसांचे क्षेत्र पुरूषप्रधान मानले जाते, आपल्या सहकारी वर्गात आणि जनतेत सर्वशक्तिमान पद गाठण्यासाठी यशाच्या पायऱ्या चढताना रश्मीने बराच संघर्ष केलेला आहे. तर दुसरीकडे, शनाया (श्रीनू पारीख) हि पत्रकारीतेचा अनुभव गाठीशी गोळा करत, महत्त्वाच्या घटनांचा परामर्श घेणाऱ्या बातम्यांच्या शोधात असते. एका वळणावर दोघींची नजरानजर होते. शनायाची महिला पोलिसावरील बातमी दणक्यात गाजते. ती पुढली मोठी ब्रेकिंग मिळवण्याच्या तयारीला लागते. तिच्या सुदैवाने शहरात हत्यांची मालिका घडते.
आपल्या वेबसाईटकरिता सनसनाटी बाटमीची तिला गरजच असते. हे कथानक पुढे सरकताना अनेक वळणे आणि नाट्यमय प्रसंग घडतात. ज्यांच्या परिणामांचा प्रेक्षक विचारही करू शकणार नाहीत.
कार्यक्रमाविषयी बोलताना हंगामा डिजिटल मिडीयाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की हंगामा ओरिजनल्सच्या डॅमेज्ड या सर्वात पहिल्या ओरिजनल शोचा शुभारंभ आम्ही केला होता आणि त्याच्या नाविन्यपूर्ण कथाकथनाला आणि ठोस पात्रांना प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली होती.
मालिकेतील प्रत्येक भाग दहा लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितला. वेगळ्या धाटणीच्या आणि नवीन कलाकारांना घेऊन करण्यात आलेल्या हा कार्यक्रमाचा आनंद लोकांनी लुटला हेच या दोन सीझनच्या यशाने सिद्ध होत आहे. अमना शरीफ आणि श्रेणू पारीख या दोन्ही महिला कलाकारांना देखील प्रेक्षकांकडून यापेक्षाही जास्त प्रेम मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
या शोचे दिग्दर्शक एकांत बाबानी म्हणाले की डॅमेज्डचा सीझन ३ हा देखील मानसिक गुन्ह्याचे नाट्य आणि अलौकीपण यांचा परस्पर संबंध दर्शवतो. मध्यवर्ती भूमिका असलेले कणखर स्त्री पात्र आणि अतिशय सुंदररीत्या दर्शविलेले नाट्य, रोमांचकारकता आणि भीतीचा उत्तम मेळ घालून प्रेक्षकांसमोर उभी केलेली अपारंपरिक कथा या दोन प्रमुख गोष्टी या सीझनचे वैशिष्ट्य आहे. अमना आणि श्रेणूसोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी होता. भारतीय सिनेमा क्षेत्रात या दोघी अतिशय प्रसिद्ध आहे. हंगामासोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणे हे माझे भाग्य आहे.



















