पाटण : पाटण शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून गुरूवारी मध्यरात्री शहरात 4 घरे व 2 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. अज्ञात चोरटा सीसीटिव्ह कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. चोरट्यांनी पाटण पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. या चोऱ्यांची नोंद शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, पाटण शहरात संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्यास तात्काळ पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन पाटण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरूवार दि. 13 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील मुख्य पेठेतील अमोल अरूण खांडके यांच्या मालकीच्या न्यु कलाकिर्ती फोटो स्टुडिओच्या दुकानाचे कुलुपू तोडून चोरट्याने 2 हजार 500 रुपये, राजेंद्र गजानन टोपले यांच्या मालकीच्या त्रिमूर्ती सुईंग मशिन दुकानाचा लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून एक हजार रुपये अशी रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शेजारील एका घरात चोरीचा प्रयत्न झाला. तसेच नवीपेठ येथील प्रशांत चाळके यांच्या बंद घरातून 2 हजार रुपये रोख चोरून नेले. तर शेजारील बादल विनायक इंगवले व सुजाता राजेंद्र घाडगे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
पाटण शहरात भरवस्तीत एका रात्रीत 4 घरे व 2 दुकाने चोरट्यांनी फोडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोऱ्या करणारा चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यामुळे पाटण शहरात संशयित कोणी दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.