कराड : काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. अनेक लाटा येतील आणि जातील. मात्र, काँग्रेस हा गोरगरीबांच्या व सर्वसामान्यांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. तो वाढविण्यासाठी सर्वांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केले.
डिजिटल सभासद नोंदणी अभियानाच्या प्रशिक्षण शिबीर प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जि. प. सदस्य उदयसिंह पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जि. प. सदस्य निवासराव थोरात, मंगला गलांडे, पं. स. सदस्य नामदेवराव पाटील, वैशाली वाघमारे, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, इंद्रजीत चव्हाण, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण आदिसह कराड दक्षिण काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या 7 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने मुख्य नोंदणीकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी हे शिबीर आयोजित केले असल्याची माहिती यावेळी मनोहर शिंदे यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जि. प. सदस्य उदयसिंह पाटील म्हणाले, आपल्या तालुक्यातील जनता काँग्रेस विचारांच्या कायम पाठीशी राहिली आहे. पक्ष वाढीसाठी पक्षाचा विचार गावागावात स्व. विलासकाकांनी पोहचवीला त्यानंतर पृथ्वीराज बाबा हे कार्य करीत आहेत. त्यांच्यासारखे लोकाभिमुख नेतृत्व आपल्याला लाभले आहे. तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी असून सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा देशपातळीवर व राज्य पातळीवर अतिशय सक्षम नेतृत्व राहिले आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहताना काँग्रेसचा विचार हा घराघरात पोहोचवला पाहिजे. काँग्रेसने कधीही भेदभाव केला नाही. या देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान असून अनेक राष्ट्रपुरुषांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. मात्र, काही मूठभर लोक आता मनभेद निर्माण करून जनतेमध्ये फुट पाडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. असे सांगताना आपल्या जिल्ह्यात तथा तालुक्यात 7 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजेंद्र शेलार म्हणाले कि, आपला जिल्हा व तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. काँग्रेस पक्षामध्ये तरुणांना काम करण्यास मोठी संधी आहे. भाजपने दोन कोटी नोकरी यांसह इतर सर्व खोटी आमिषे दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. तेव्हा प्रत्येकाने अधिक काम करताना काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचविला पाहिजे यासाठीच सभासद नोंदणी अभियान प्रभाविपणे राबविले पाहिजे. यावेळी शेलार यांनी प्रेसेंटेशन करुन अभियान कसे राबविले पाहिजे याची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा समन्वयक संदीप चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी काँग्रेस सदस्य नोंदणी डिजिटल अभियान गट निहाय पद्धतीने कशी करावी याची माहिती दिली तसेच उपस्थित्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अजितराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. तर कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.



















